व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘कमळा’ची परीक्षा, भाजपचे कोहळे, सोले अन् सेनाड एकाच दिवशी अर्ज भरणार

‘कमळा’ची परीक्षा, भाजपचे कोहळे, सोले अन् सेनाड एकाच दिवशी अर्ज भरणार

नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये बंडाचे निशाण

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजमधील पक्षातील अंतर्गत असंतोष उफाळून आला असून पक्षात उघड-उघड बंडखोरी झाली आहे. भाजपने अधिकृत उमेदवारी सुधाकर कोहळे यांना जाहीर केली असली, तरी पक्षाचे माजी आमदार अनिल सोले आणि निष्ठावंत स्वयंसेवक रमण सेनाड यांनी बंडाचे निशाण उभारले आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे हे तिन्ही शिलेदार आज, सोमवारी एकाच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या अनपेक्षित भूकंपामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, ही बंडखोरी रोखण्यासाठी मोठी दमछाक होणार आहे.

सुधाकर कोहळे यांना पक्षाने आधीच शब्द दिला होता आणि ते वर्षभरापासून तयारीत होते. मात्र, एकाच नेत्याला वारंवार संधी का दिली जाते, असा संतप्त सवाल स्थानिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. कोहळे हे दक्षिण नागपूरचे माजी आमदार, नागपूर शहराध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त आणि नागपूर ग्रामीण भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत. अगदी अलीकडेच त्यांना पश्चिम नागपूर विधानसभेतूनही उमेदवारी दिली गेली होती. मग प्रत्येक महत्त्वाच्या जागेवर कोहळेच का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

शिंदेंच्या माणसांचं चाललय काय? आणखी एक नेता खंडणीबहाद्दर!

दुसरीकडे, या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले माजी आमदार आणि नागपूरचे माजी महापौर अनिल सोले यांचे तिकीट गेल्या वेळी कारण नसताना कापले गेले होते, ज्याची मोठी किंमत भाजपला हा परंपरागत मतदारसंघ गमावून मोजावी लागली होती. चार वेळा नगरसेवक राहिलेल्या सोले यांच्या ऊर्जा बचतीच्या उपक्रमाचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कौतुक केले होते. पक्षाने जुनी चूक दुरुस्त करून सोले यांना संधी द्यायला हवी होती, अशी कार्यकर्त्यांची ठाम भावना आहे.

‘कुणबी समाज एकत्र आला तर मुख्यमंत्री आपलाच’

तसेच, गेली अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे स्वयंसेवक रमण सेनाड यांना साध्या महापालिका निवडणुकीतही डावलले गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप आहे. आम्ही फक्त पक्षासाठी घाम गाळायचा आणि पक्ष सोयीनुसार बाहेरच्यांना महत्त्व देणार असा खडा सवाल सेनाड समर्थकांनी केला आहे. एकाच दिवशी तिघांनीही उमेदवारी अर्ज भरण्याचा पवित्रा घेतल्याने भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. वरिष्ठ नेते ही बंडखोरी कशी शमवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र बंडखोरी कायम राहिली तर भाजपला पुन्हा एकदा धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागण्याचा धोका लागू शकतो.

error: Content is protected !!