सुधीरभाऊंचा चार दशकांचा प्रवास विचार एकच भाजपा
Nagpur : सध्याच्या राजकारणात निष्ठवंत कोणाला म्हणायचे असा प्रश्न पडतो. सत्ता आणि सोयीचे राजकरण बिनधास्तपणे सुरू आहे. सत्ता बदलली की नेत्यांचे धोरण आणि निष्ठाही कपडे बदलल्याप्रमाणे बदलत आहे. राजकारणात पक्ष बदलणे आज नवे राहिलेले नाही. सत्ता बदलली की समीकरणे बदलतात आणि समीकरणे बदलली की राजकीय वाटाही बदलतात. काल एका पक्षाचा झेंडा खांद्यावर असलेले चेहरे आज दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर सहज दिसतात. याचे कोणाला हल्ली वावगेसुद्धा वाटत नाही. या बदलत्या राजकीय वास्तवाच्या काळात काही प्रवास मात्र ठळकपणे वेगळे दिसतात. सुधीर मुनगंटीवार यांचा प्रवास त्यापैकी एक आहे.त्यांची राजकीय कारकीर्द भाजपच्या संघर्षाच्या काळात सुरू झाली. त्या वेळी पक्षाकडे सत्ता नव्हती; मात्र संघटन उभे करण्याची आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची मोठी जबाबदारी होती.
भाजपची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. पक्ष सत्तेपासून दूर होता आणि भविष्यात सत्ता कधी येईल, याचीही निश्चितता नव्हती. अशा काळात या उमद्या तरुणाने विधानसभेत आपला आवाज बुलंद केला आणि जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची मागणी त्यांनी लावून धरली; बल्लारपूरला स्वतंत्र तालुका मिळावा यासाठी प्रयत्न केले. नागपूर, अमरावती आणि पुणे विद्यापीठांना अनुक्रमे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची नावे देण्याच्या मागण्यांसाठीही त्यांनी आवाज उठवला.
आदिवासी समाजातील प्रलंबित पदभरती, मातंग समाजासाठी स्वतंत्र आयोग आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वारसांच्या प्रश्नांसारखे सामाजिक विषयही त्यांनी विधानसभेच्या पटलावर मांडले. म्हणजे विरोधी बाकावर बसलेला नेता केवळ सरकारला विरोध करत नव्हता; तो प्रश्न घेऊन उभा राहत होता, त्यावर सरकारला जाब विचारत होता आणि तो प्रश्न मार्गी लागेपर्यंत त्याचा पाठपुरावा करत होता. सत्ता हातात नसतानाही कामाचा ध्यास कायम ठेवणे, ही त्यांच्या राजकीय प्रवासातील निष्ठेची पहिली आणि महत्त्वाची खूण होती.
‘कमळा’ची परीक्षा, भाजपचे कोहळे, सोले अन् सेनाड एकाच दिवशी अर्ज भरणार
ही निष्ठा एका दिवसात तयार झालेली नव्हती. तिची मुळे घरापासूनच खोलवर रुजलेली होती. सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घकाळ जोडलेले होते. जनसंघाच्या काळापासून घरात रुजलेला राष्ट्रविचार, संघटन आणि समाजसेवेची संस्कृती सुधीर मुनगंटीवार यांनी जवळून अनुभवली. पुढे हाच विचार त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा आधार बनला. त्यामुळे भाजपशी त्यांचे नाते एखाद्या राजकीय सोयीचे नाते नव्हते. ते घरातून आलेल्या विचारपरंपरेचे आणि स्वतःच्या सार्वजनिक जीवनात स्वीकारलेल्या भूमिकेचे नाते होते. म्हणूनच परिस्थिती बदलली, राजकीय समीकरणे बदलली, तरी त्यांची दिशा बदलली नाही.
१९८१ मध्ये, वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी, चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस म्हणून त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामाला सुरुवात केली. तो काळ आजच्या भाजपच्या राजकीय सामर्थ्याचा नव्हता. पक्ष उभा करायचा होता, कार्यकर्ते जोडायचे होते आणि विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवायचा होता. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे प्रदेश सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील प्रदीर्घ कारकीर्दीपर्यंत पोहोचला. १९९५ मध्ये प्रथम विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी सलग सात विधानसभा निवडणुकांत विजय मिळवला. या संपूर्ण प्रवासात राजकीय परिस्थिती बदलत गेली, जबाबदाऱ्या वाढत गेल्या, पदे बदलत गेली; मात्र पक्षाशी असलेली त्यांची नाळ कायम राहिली.
चंद्रपूरच्या संघटनात्मक कामापासून सुरू झालेली ही वाटचाल आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एका ज्येष्ठ नेत्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. पदे आणि जबाबदाऱ्या वाढत गेल्या; मात्र सुरुवातीच्या कार्यकर्त्याची पक्षाशी असलेली बांधिलकी कायम राहिली. याच सातत्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला केवळ पदांची यादी म्हणून पाहता येत नाही; त्यामागे दशकानुदशकांचा संघटनात्मक अनुभव आणि विचाराशी असलेली बांधिलकी दिसून येते.
मुनगंटीवारांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी गांभीर्याने घेतले. प्रत्येक जबाबदारीचा अभ्यास केला आणि ती समर्थपणे निभावण्याचा प्रयत्न केला. आज विधानसभेत मांडत असलेल्या भूमिका असोत किंवा जनतेच्या प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा, प्रश्नाची तीव्रता समजून घेऊन तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या कामाची लकब राहिली आहे. परिस्थिती प्रतिकूल असो किंवा राजकीय अपेक्षा वेगळ्या असोत, त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले.
आज भाजप महाराष्ट्रात सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. या काळात अनेक राजकीय चेहरे भाजपमध्ये आले आहेत. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे आणि प्रत्येकामागची कारणेही वेगळी आहेत. पण मुनगंटीवारांची कथा यापेक्षा वेगळी आहे. ते भाजपमध्ये सत्तेसाठी आले नाहीत; भाजपसोबत संघर्ष करत करत सत्तेपर्यंत पोहोचले. त्यांनी पक्षाकडे केवळ पदाच्या नजरेने नव्हे, तर विचाराच्या नजरेने पाहिले. म्हणूनच आज मुनगंटीवारांकडे पाहताना १९८१ च्या त्या कार्यकर्त्याला विसरून चालणार नाही. पदांनी त्यांची उंची वाढवली असेल; पण दीर्घकाळ टिकवलेली निष्ठाच त्यांच्या राजकीय ओळखीचा गाभा ठरली.
म्हणूनच ‘मुनगंटीवार म्हणजे भाजपाचे खरे निष्ठावंत’ हे केवळ कौतुकाचे वाक्य नाही. त्यामागे चार दशकांहून अधिक काळाची सलग कहाणी आहे. सत्ता आली म्हणून पक्षाशी नाते जोडले गेले नाही आणि सत्ता नसताना ते नाते सैल झाले नाही. राजकीय आयुष्यात चढ-उतार आले, अपेक्षा आल्या, संधी आल्या, काही वेळा संधी दुसऱ्यांच्या वाट्याला गेल्या; पण त्यांनी आपली राजकीय दिशा बदलली नाही.पक्षाकडून अन्याय झाला तरी त्यांनी नाराजीला पक्षापासून दुरावण्याचे कारण बनू दिले नाही. भाजपचा विचार त्यांच्या प्रत्येक भूमिकेत आणि वक्तव्यात तितक्याच ताकदीने उमटत राहिला. हीच त्यांच्या पक्षनिष्ठेची आणि स्थितप्रज्ञतेची खरी ओळख ठरते.
त्यांनी भाजपसोबत केवळ काळ घालवला नाही; काळ बदलत असतानाही पक्षाशी असलेले नाते जपले. म्हणून त्यांच्या निष्ठेचा पुरावा एखाद्या भाषणात किंवा एखाद्या घोषणेत शोधण्याची गरज नाही. तो १९८१ पासून आजपर्यंतच्या त्यांच्या वाटचालीत दिसतो. संघटनेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून विधानसभेतील प्रदीर्घ प्रवासापर्यंत आणि विविध जबाबदाऱ्यांपासून आजच्या राजकीय भूमिकेपर्यंत या नात्याची सलगता दिसून येते.
राजकारणात सत्ता येते-जाते. पदे मिळतात आणि जातात. समीकरणे बदलतात. चेहरे बदलतात. पण काही माणसांची खरी ओळख त्यांना मिळालेल्या पदांपेक्षा त्यांनी न सोडलेल्या वाटेतून तयार होते. मुनगंटीवारांचा प्रवास अशीच एक वाट दाखवतो. १९८१ च्या तरुण कार्यकर्त्यापासून आजच्या ज्येष्ठ नेत्यापर्यंतचा हा प्रवास एका पक्षाच्या झेंड्याखाली अखंड चाललेला आहे. त्यात संघर्ष आहे, यश आहे, जबाबदाऱ्या आहेत; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे संयम आहे, विचाराशी बांधिलकी आहे आणि परिस्थितीपेक्षा भाजपा म्हणजे प्राण मानण्याची वृत्ती आहे.
म्हणूनच ‘मुनगंटीवार म्हणजे भाजपाचे खरे निष्ठावंत’ हे कोणीतरी दिलेले प्रमाणपत्र नाही; त्यांच्या चार दशकांहून अधिक काळाच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यानंतर आपोआप उमटणारा निष्कर्ष आहे. सत्ता बदलली, परिस्थिती बदलली, राजकीय समीकरणांनी अनेक वळणे घेतली; पण भाजपशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही. पदे बदलत गेली, जबाबदाऱ्या वाढत गेल्या; मात्र पक्षाशी असलेली बांधिलकी कायम राहिली. म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी ओळख पदांमध्ये नाही, तर बदलत्या काळातही अबाधित राहिलेल्या पक्षनिष्ठेत आहे.








