गोविंद बागेत थेट शेतात उतरून केली पाहणी; AI तंत्रज्ञानामुळे उत्पादन दुप्पट
Mumbai: ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार का, याबाबत काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. विविध नेत्यांकडूनही या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीतील गोविंद बाग येथे थेट शेतात उतरून ऊसशेतीची पाहणी केली. त्यांच्या या कृतीमुळे निवृत्तीच्या चर्चांपेक्षा शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनवाढीच्या प्रयोगाकडे लक्ष वेधले गेले आहे.
बारामतीतील गोविंद बाग हे शरद पवार यांचे निवासस्थान आहे. येथे असलेल्या शेतीमध्ये त्यांनी ऊस पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे, या ऊसशेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून गोविंद बागेतील ऊसाचे सरासरी उत्पादन एकरी सुमारे ६० टन होते. मात्र, यंदा AI आधारित शेती व्यवस्थापनामुळे हे उत्पादन एकरी १२० टनांपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे. मातीची गुणवत्ता, हवामान, पाण्याचे नियोजन, खतांचा संतुलित वापर आणि पिकांवरील रोग-किडींचे व्यवस्थापन अशा विविध बाबींचा अभ्यास करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतीचे नियोजन करण्यात आले.
पक्षांतराच्या संशयातून राजीनामा देणाऱ्या आमदार – खासदारांना बसणार लगाम?
दरम्यान, शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. पवार यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी इच्छा व्यक्त करताना ते आजही विविध प्रकल्प आणि कामांमध्ये रस घेत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगत, ते आयुष्यात कधीही थांबणार नाहीत आणि सातत्याने सकारात्मक काम करत राहतील, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
भाजपला शरद पवारांची साथ हवी, पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पेच कायम!
दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही निवृत्तीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शरद पवार हे अद्याप राज्यसभेचे सदस्य असून त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय जनता घेईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोविंद बागेतील ऊसशेतीची पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रयोगातील सहभाग यामुळे शरद पवार यांच्या सार्वजनिक सक्रियतेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.








