व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अमरावतीत काँग्रेसच्या उमेदवाराला ठाकरेंचे आव्हान, तरीही सपकाळ म्हणतात ‘मित्रपक्ष आमच्यासोबत’

अमरावतीत काँग्रेसच्या उमेदवाराला ठाकरेंचे आव्हान, तरीही सपकाळ म्हणतात ‘मित्रपक्ष आमच्यासोबत’

नागपुरात भाजपमध्ये, अमरावतीत महाविकास आघाडीत बंडखोरी

Nagpur विधान परिषदेच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपुढेही बंडखोरांनी तगडे आव्हान उभे केले आहे. नागपुरात भाजपत अंतर्गत बंडखोरी उफाळून आली असताना, अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र मविआतील घटक पक्षांमध्येच कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून अमरावतीतील बंडखोरी शमवू आणि नागपूरमधून अभिजीत वंजारीच विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

परंतु, प्रत्यक्षातील राजकीय चित्र मात्र अत्यंत गुंतागुंतीचे आणि तणावपूर्ण बनले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने आदिती पोहरे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या जागेवरचा दावा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काँग्रेसच्या घोषणेनंतर लागलीच ‘सामना’ वृत्तपत्रातून ठाकरे सेनेने प्रा. लहाने यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे अमरावतीतून शेवटी कोण माघार घेणार, की मविआत उघड फूट पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी दिली, यादीत नाव आले अन् ऐनवेळी उमेदवाराची माघार

नागपूर पदवीधर मतदारसंघातून मविआचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी रिंगणात असले, तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव नीलेश कराळे गुरुजी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत आव्हान उभे केले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सांगण्यावरून माघार घेतली होती, मात्र यावेळी मागे हटणार नाही, अशा आक्रमक भूमिकेत कराळे गुरुजी आहेत.
दुसरीकडे, शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांनी नागपुरात अतुल देशमुख यांना उमेदवारी देऊन काँग्रेसची अडचण वाढवली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचे पालन केले नाही, असा थेट आरोप करत कपिल पाटील यांनी आपल्या उमेदवाराला मैदानात उतरवले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी मित्रपक्ष पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे कराळे गुरुजी आणि ठाकरे सेनेचे प्रा. लहाने यांना माघार घेण्यास ते कशा प्रकारे भाग पाडतात, हा मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते यावर तोडगा काढतात की ही बंडखोरी मैत्रीपूर्ण लढत’ म्हणून स्थानिक नेत्यांवर सोडून देतात, याचे उत्तर येत्या चार दिवसांत स्पष्ट होईल.

 

error: Content is protected !!