व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण उमेदवारी दिली, यादीत नाव आले अन् ऐनवेळी उमेदवाराची माघार

उमेदवारी दिली, यादीत नाव आले अन् ऐनवेळी उमेदवाराची माघार

जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसची कोंडी; उमेदवारीवरून महायुतीत शिवसेनाही नाराज

Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या राजकारणाने महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. काँग्रेसने ज्या उमेदवाराच्या उमेदवारीसाठी विशेष राजकीय ताकद लावली, त्यांचे नाव अधिकृत यादीत समाविष्ट केल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने पक्षाची मोठी कोंडी झाली. परिणामी पॅनलमधील जागा रिक्त राहू नये म्हणून अपक्ष म्हणून रिंगणात असलेले कर्मचारी नेते रवींद्र देशमुख यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देत त्यांना उमेदवारी देण्याची वेळ पक्षावर आली.

संबंधित उमेदवाराच्या उमेदवारीसाठी यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी विशेष आग्रह धरल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात होती. जिल्हा बँकेच्या कारभारावर यापूर्वी प्रश्न उपस्थित करणाऱ्या या उमेदवाराचे नाव महाविकास आघाडीच्या अधिकृत यादीत आल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी अर्ज मागे घेतल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांसमोर अचानक पेच निर्माण झाला.

एकत्रित काम करण्याचा संदेश; मात्र भाजपमध्ये ‘सायलेंट वॉर’ची चर्चा

जिल्हा बँकेतील काही जागा बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. या पार्श्वभूमीवर आपला क्रमांक लागेल, या अपेक्षेने संबंधित उमेदवाराने उमेदवारीसाठी आग्रह धरला होता, अशी पक्षांतर्गत चर्चा आहे. मात्र, बिनविरोध निवडणुकीच्या हालचाली फिस्कटल्यानंतर निवडणूक लढविण्याची वेळ आली आणि त्याचवेळी संबंधित उमेदवाराने माघार घेतल्याने काँग्रेसच्या पॅनलची जुळवाजुळव करण्याचे आव्हान उभे राहिले.

विशेष म्हणजे, या माघारीची पूर्ण कल्पना आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनाही देण्यात आली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर आग्रह धरण्यात आला, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात माघार का घेतली, हा प्रश्न आता काँग्रेसमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ऐनवेळी निर्माण झालेली पॅनलची अडचण दूर करण्यासाठी काँग्रेसने अपक्ष कर्मचारी नेते रवींद्र देशमुख यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ही प्रक्रिया काँग्रेसच्या ‘डॅमेज कंट्रोल’चा भाग असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या उमेदवारीवरून महायुतीतील शिवसेनेतही नाराजीचे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार यांनी समाजमाध्यमावरील पक्षाच्या गटात केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. ‘निष्ठावान शिवसैनिकांच्या बळीची सुरुवात, सावधान यवतमाळ जिल्हा शिवसेना’ या आशयाच्या पोस्टमधून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अनिल सोले आमचे नेते आहेत… बावनकुळेंची सावरासावर

लिंगणवार हे पालकमंत्री संजय राठोड यांचे समर्थक मानले जातात. जिल्हा गटातून निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांचे नाव बाजूला पडून शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले खासदार संजय देशमुख यांच्या समर्थकाला उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांऐवजी नव्याने पक्षात आलेल्यांना प्राधान्य दिल्याची भावना शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

लिंगणवार यांनी पोस्टमध्ये थेट कोणाचेही नाव घेतलेले नसले, तरी ‘सावधान’चा इशारा नेमका कुणासाठी, यावरून राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत. काँग्रेसमधील उमेदवाराची माघार आणि शिवसेनेतील नाराजी या दोन्ही घडामोडींमुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ पॅनलच्या लढतीपुरती मर्यादित न राहता पक्षांतर्गत राजकारणाचीही कसोटी ठरण्याची चिन्हे आहेत. आता ज्यांच्यासाठी ताकद पणाला लावली, त्यांनी माघार का घेतली आणि ‘सावधान’चा इशारा देणाऱ्या लिंगणवारांच्या नाराजीचे पुढे काय पडसाद उमटतात, याकडे यवतमाळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

____

 

error: Content is protected !!