दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना निवडणुकीत उधळण
Yavatmal : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये यंदा दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद केले आहे. पावसाने ओढ दिल्याने कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून, उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक आधारवड मानल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने मात्र राजकीय वातावरण तापवले आहे. सत्तेच्या या लढतीत मोठ्या आर्थिक उलाढालीची चर्चा सुरू झाल्याने ‘शेतकरी संकटात आणि सत्तेसाठी कोटींची उधळण?’ असा सवाल आता उपस्थित होत आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २५ पैकी २३ संचालकपदांसाठी ११ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. महायुतीच्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळीराजा सहकार पॅनलसमोर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शेतकरी सहकार विकास आघाडीचे आव्हान आहे.
तालुका गटातून दिग्रस येथून खासदार संजय देशमुख आणि पुसद येथून विजय जाधव हे महायुतीचे दोन उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीला सुरुवातीलाच काहीसा दिलासा मिळाला असला, तरी उर्वरित जागांसाठी प्रत्येक मत निर्णायक मानले जात आहे.
निवडणुकीतील मतदारसंख्या मर्यादित असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. काही मतदारांना पर्यटनस्थळी नेणे, देवदर्शन घडविणे किंवा इतर माध्यमातून संपर्कात ठेवण्याच्या हालचालींबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक व्यवहारांची चर्चा होत असली, तरी त्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
सहकार क्षेत्रातील दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणूक लढविण्याबाबतच्या नियमांमुळे यंदाच्या निवडणुकीचे समीकरणही बदलले आहे. काही विद्यमान संचालकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना राजकीय वारस म्हणून पुढे केले आहे.
माजी अध्यक्ष मनीष पाटील यांच्या पत्नी तृप्ती पाटील, आमदार संजय देरकर यांच्या पत्नी किरण देरकर, माजी उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांचे पुत्र विराज घुईखेडकर, माजी उपाध्यक्ष नरेंद्र ठाकरे यांचे पुत्र सारंग ठाकरे, माजी संचालक शंकरराव राठोड यांचे पुत्र सुशील राठोड आणि ज्येष्ठ संचालक शिवाजी राठोड यांचे पुत्र महेश राठोड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीचे अमन गावंडे आणि प्रकाश देवसरकर यांचीही उमेदवारी चर्चेत आहे.
२३ संचालकपदांसाठी एकूण ६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा गटातील ११ जागांसाठी ९७९ मतदार मतदान करणार आहेत. तालुका गटातील १४ जागांसाठी ३१ उमेदवार असून या गटात ५९५ मतदार आहेत. व्हीजेएनटी, इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमाती गटातून मिळून ११ उमेदवार मैदानात आहेत. महिला गटातील दोन जागांसाठी सात महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा!
एकीकडे दुष्काळ, पीक नुकसानीचे संकट आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढत असताना दुसरीकडे जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय ताकद पणाला लागली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया न राहता जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील वर्चस्वाची लढाई ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेणाऱ्या बँकेच्या सत्तेसाठी जर आर्थिक ताकदीचे प्रदर्शन होत असेल, तर त्याचा सर्वाधिक फटका शेवटी सामान्य सभासद आणि शेतकऱ्यांनाच बसणार नाही का, हा प्रश्नही या निमित्ताने चर्चेत आला आहे.








