केंद्रीय पथकासमोर भीषण वास्तव, आज बांधावर पाहणी
Yavatmal : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य आता पीक सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर येत आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, काही शेतांमध्ये उत्पादन शून्य नोंदवावे लागले आहे. तर अनेक ठिकाणी उत्पादनात मोठी घट झाल्याचे संयुक्त सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकासमोर प्रशासनाने दुष्काळाची भीषणता मांडली असून, शनिवारी पथक प्रत्यक्ष शेतांवर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय पथकाच्या अहवालाकडे आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाभरात सुरू असलेले पीक पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत. कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकांनी शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी केली. या सर्वेक्षणात काही भागांत उत्पादन पूर्णपणे निरंक असल्याचे नोंदविण्यात आले, तर इतर ठिकाणी ४५० ग्रॅमपासून अर्धा क्विंटलपर्यंत उत्पादनात घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या नोंदींमुळे जिल्ह्यातील शेतीची परिस्थिती किती गंभीर बनली आहे, याची कल्पना येते.
सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे न भरणे, कापसाचे पीक वाढत्या उन्हामुळे करपणे आणि अपरिपक्व बोंडे फुटणे, अशा समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. कापसाच्या वेचणीचे तीन टप्पे अपेक्षित असताना काही गावांमध्ये पहिल्याच टप्प्यात झाडे करपल्याचे चित्र आहे. तुरीच्या पिकालाही प्रतिकूल परिस्थितीचा फटका बसला आहे. या सर्व बाबींचा समावेश असलेला अहवाल जिल्हा प्रशासनाने केंद्रीय पथकासमोर सादर केला आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दौरा महत्त्वाचा ठरत आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी चारा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि धरणांतील जलसाठ्यांची स्थिती याबाबत पथकाला माहिती दिली. जिल्ह्याची परिस्थिती मांडण्यासाठी प्रशासनाला सुमारे २० मिनिटांचा अवधी मिळाला.
आता प्रत्यक्ष शेतांवरील पाहणीदरम्यान पथकाला नुकसानाची तीव्रता कितपत दिसून येते आणि त्याचा अंतिम अहवालात कसा उल्लेख होतो, याकडे लक्ष लागले आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पीक पंचनामे, प्रत्यक्ष पाहणी आणि प्रशासकीय अहवाल यांच्या आधारे पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय पथक शनिवारी यवतमाळ तालुक्यातील लासिना आणि मडकोना येथे शेतांची पाहणी करणार आहे. त्यानंतर नेर तालुक्यातील लोणी, मांडवगड, वटफळी आणि दोडकी या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यावर या दौऱ्यात भर असेल.
निसर्गाच्या प्रतिकूलतेमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता चारा, पिण्याचे पाणी आणि आगामी शेती हंगामाचे नियोजन अशी अनेक आव्हाने आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे पीक सर्वेक्षणातून पुढे आले असले, तरी प्रत्यक्ष मदतीसाठी पुढील प्रशासकीय निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
नागपूर भाजपमध्ये राजकीय स्फोट, अनिल सोले यांच्या समर्थनासाठी गिरीश व्यास मैदानात
केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर अंतिम अहवाल आणि शासनाची भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार का, नुकसानभरपाईबाबत कोणते निर्णय घेतले जाणार आणि प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, या प्रश्नांची उत्तरे आता आगामी घडामोडींमध्ये मिळण्याची अपेक्षा आहे.








