व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण भाजपमध्ये वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप करणारा तो नेता कोण?

भाजपमध्ये वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप करणारा तो नेता कोण?

 

अनिल सोलेंनी व्यक्त केली खंत;बंडखोरीचे कारण स्पष्टच सांगितले

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षांतर्गत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट बंडखोरी केली असून. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही मात्र काही नेते वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप करीत असल्याचा टोला लगावला. त्यामुळे त्यांना रोष नेमका कुणावर यावर भाजपमध्ये चर्चा रंगली आहे.

ते म्हणाले, भाजप हा नेहमीच कार्यकर्त्यांचा पक्ष समजला जात असे. उमेदवार निवडताना कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जात होते आणि कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वांचे ऐकून घेऊन नावावर शिक्कामोर्तब केले जात होते. मात्र, आता सर्व उलट झाले असून वरून उमेदवार लादला जात आहे, असा गंभीर आरोप अनिल सोले यांनी केला आहे. उमेदवार निवडताना काही नेत्यांचा हस्तक्षेप वाजवीपेक्षा खूपच वाढला असून, जुन्या आणि निष्ठवंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गडचिरोलीतील ९० आश्रमशाळांची पटपडताळणी; तीन टक्के विद्यार्थी गैरहजर

भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विरोधात सोले यांनी दंड थोपटले आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितली होती आणि मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटसुद्धा घेतली होती. मात्र, पक्षीय पातळीवर कुणीही त्यांना स्पष्ट शब्द दिला नाही किंवा थांबण्यास सांगितले नाही. यादरम्यान, सुधाकर कोहळे यांचे नाव पक्षाच्या बैठकीत चर्चा न करता परस्पर जाहीर करण्यात आले आणि कार्यकर्त्यांकडून ते वदवून घेण्यात आले. यावर सोले यांची तीव्र नाराजी होती.
पक्षाकडून उमेदवारी मागे घेतली जाईल याची खात्री वाटल्याने, सोले यांनी काही दिवस स्वतःला नॉट रिचेबल करून घेतले होते. त्यांनी फोन बंद ठेवले आणि घरी आलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणेही टाळले. आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या दिवशी मौन सोडत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांचे सफोकेशन होत असून, पक्षासाठी घाम गाळलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना अडगळीत टाकले जात आहे, असे सांगत त्यांनी आपली वेदना मांडली.

यवतमाळ जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद; शेतात शून्य उत्पादनाची नोंद

माघार घेण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण पराभूत होण्यासाठी नाही, तर विजयासाठी लढत असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधर मतदारसंघात केवळ पक्षाच्या नावावर निवडणूक जिंकता येत नाही, तर त्यासाठी वैयक्तिक संपर्क, विविध संघटनांचे सहकार्य आणि पसंतीक्रमाचे महत्त्व असते. या मतदारसंघात आपले कार्य आणि संपर्क असल्याने पदवीधर मतदार आपल्यालाच पहिली पसंती देतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सोले यांनी आपल्या भाषणात कोणाचेही थेट नाव घेतले नसले, तरी या बंडखोरीमुळे नागपूर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून आगामी निवडणुकीत पक्षाच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 

error: Content is protected !!