नाराजीचा स्फोट होईल; महायुतीतील मतभेदांच्या चर्चेवर भाष्य
Amravati उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. काही महत्त्वाच्या बैठकांना त्यांची अनुपस्थिती आणि दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सूचक विधान केले आहे. एकनाथ शिंदे नाराज नाहीत; मात्र ते नाराज झाले, तर मोठा स्फोट होईल आणि सरकारही बदलू शकते, असे कडू म्हणाले. अमरावती येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
‘शिंदे सदाबहार, त्यांना नाराज करू नये’
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले, “शिंदे साहेब नाराज होत नाहीत, हे मला माहीत आहे. ते सदाबहार आहेत. त्यामुळे कुणीही चिंता करण्याची गरज नाही. मात्र, ते नाराज झाले, तर स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांना कुणीही नाराज करू नये, एवढीच माझी विनंती आहे.”
अमरावतीच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली
कडू यांच्या या विधानामुळे महायुतीमधील अंतर्गत परिस्थितीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
बैठकांना अनुपस्थितीवर शिंदेंची पाठराखण
एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी दुष्काळविषयक बैठकीला आणि त्यानंतर वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर कडू यांनी शिंदे यांची पाठराखण केली.
“त्यांना काही काम असेल, त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसतील. मात्र, शिवसेनेचे इतर मंत्री बैठकीला उपस्थित होते ना,” असे म्हणत त्यांनी या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले.
निवडणुकीत सर्वांचे लक्ष उमेदवारांच्या विजयावर
महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद आहेत का, या प्रश्नावर कडू म्हणाले, “मला वाटत नाही की काही मतभेद आहेत. निवडणुकीच्या काळात छोटे-मोठे पक्ष मतभेद करत बसत नाहीत. सर्वांनाच आपापले उमेदवार निवडून आणायचे असतात. निवडणुकीनंतर काय होईल, हे सांगता येणार नाही; मात्र सध्या तसे काही दिसत नाही.”
शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देता, आम्हाला भिकारी समजता का?, तुपकर संतापले
‘मोठे नेते सहसा नाराज होत नाहीत’
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास काय होऊ शकते, याबाबत कडू यांनी पुन्हा सूचक विधान केले. “एकनाथ शिंदे साहेब नाराज झाले, तर मोठा स्फोट होईल. आम्हाला माहीत आहे, सरकार बदलून जाते. त्यामुळे मोठे नेते सहसा नाराज होत नसतात,” असे ते म्हणाले.
बच्चू कडू यांच्या या विधानामुळे महायुतीतील राजकीय घडामोडी आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबतच्या चर्चांना पुन्हा चालना मिळाली आहे.








