
सोनसरी आश्रमशाळा विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणी अखेर अधीक्षिकेच्या निलंबनासह गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
Gadchiroli : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी भविष्यात अशी घटना घडल्यास केली जाईल, अशी भूमिका मांडल्याचे सांगितले जात असल्याने, सध्याच्या घटनेतील जबाबदारी निश्चित करण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर आता मंत्री उईके यांनी घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे, तसेच संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
सोनसरी येथील घटनेपूर्वी जपतलाई येथे सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांचे स्वरूप वेगवेगळे असले, तरी आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासव्यवस्थेतील सुरक्षितता, प्रशासनाची देखरेख आणि संभाव्य धोके वेळेत ओळखण्याची यंत्रणा याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यानंतरच चौकशीचा विचार करण्याऐवजी, सध्याच्या घटनांमधील संभाव्य त्रुटींची तपासणी करून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याची भूमिका चर्चेत आली होती.
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पदरी पाच हजारांची मदत; सरकारच्या घोषणेवर शेतकरी नेत्यांची नाराजी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री डॉ. उईके यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली आणि कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकरणातील संबंधितांची जबाबदारी तपासून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत पीडित कुटुंबाला अनुग्रह अनुदान म्हणून दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
दरम्यान, गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना मंत्री उईके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्याध्यापक तसेच अधीक्षक – अधीक्षिकांशी नियमित संवाद साधून शाळा आणि वसतिगृहांतील परिस्थितीची माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापुढे आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बोगस मतदानानंतर आता पदवीधरांची नावे कापण्याचे भाजपचे षडयंत्र
मात्र, या निर्णयाची खरी कसोटी केवळ आदेश देण्यापुरती मर्यादित राहणार नाही. सोनसरीतील घटनेमागील परिस्थितीची निष्पक्ष चौकशी, जबाबदारीचे स्पष्ट निर्धारण आणि दोष आढळल्यास प्रत्यक्ष कारवाई यांना महत्त्व असेल. जपतलाई आणि सोनसरीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कितपत प्रभावीपणे राबवल्या जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची जबाबदारी ही केवळ दुर्घटनेनंतरच्या चौकशीपुरती मर्यादित नसून, ती नियमित देखरेख आणि वेळीच हस्तक्षेपातूनही सिद्ध व्हायला हवी. त्यामुळे मंत्री उईके यांनी दिलेल्या नव्या निर्देशांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, हेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.
____








