व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या बोगस मतदानानंतर आता पदवीधरांची नावे कापण्याचे भाजपचे षडयंत्र

बोगस मतदानानंतर आता पदवीधरांची नावे कापण्याचे भाजपचे षडयंत्र

विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप, राजकारण तापले

Nagpur विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असतानाच, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बोगस मतदारांची नावे समाविष्ट करून जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस विचारधारेच्या मतदारांची नावे मतदार यादीतून कापण्याचे षडयंत्र रचले आहे, असा खळबळजनक आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दांत घणाघात केला.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील काँग्रेस विचारधारेच्या हजारो सुशिक्षित नागरिकांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अधिकृतपणे नावनोंदणी केली होती. मात्र, अंतिम मतदार याद्यांमधून ही नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत. काँग्रेस समर्थकांची नावे कट करून बेईमानीच्या बळावरच निवडणूक जिंकण्याचा भाजपचा हा डाव आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार करा; शिवसेना संपर्कप्रमुखांचे पालकमंत्र्यांना पत्र

जागावाटप आणि उमेदवारांच्या निवडीवरून महायुतीमध्ये प्रचंड असंतोष आणि मोठी नाराजी असल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले, महायुतीचे नेते पाचही जागा जिंकण्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यात अंतर्गत कलह आणि बंडखोरी उफाळून आली आहे. नेते एकमेकांची जिरवण्यात व्यस्त आहेत. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रारींचा पाऊस पडत असून एकमेकांच्या फाईली अडकवण्याचे काम सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या संचालकांची मंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक; शिंदेसेनेच्या भूमिकेकडे लक्ष!

मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री दांडी मारून आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत आहेत. हा वाद आता विकोपाला गेला असून दसरा-दिवाळीनंतर महायुतीतील हा अंतर्गत संघर्ष उघड्यावर येईल आणि सरकारमधील उणिवा स्पष्ट दिसतील, असा टोलाही त्यांनी लगावला.सत्ताधाऱ्यांच्या या आपापसातील भांडणात आणि राजकीय कुरघोडीत महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. प्रशासकीय कामे खोळंबली असून जनतेची कोणतीही कामे मार्गी लागत नाहीत. सरकारकडून केवळ पोकळ घोषणा केल्या जात आहेत, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

error: Content is protected !!