व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण काँग्रेसला काहीच जमत नसल्याने नैराश्य; पोकळ टीका करण्यात नेते व्यस्त

काँग्रेसला काहीच जमत नसल्याने नैराश्य; पोकळ टीका करण्यात नेते व्यस्त

अतुल लोंढेंच्या गरब्यावरील आरोपांना मंत्री आशिष शेलारांचे प्रत्युत्तर

Nagpur दुष्काळात भाजप नेत्यांकडून गरब्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याच्या काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या आरोपांचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नागपूर येथे चांगलाच समाचार घेतला. आम्ही सामाजिक उपक्रम आणि धार्मिक भावनांचा समतोल राखून काम करतो. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. अतुल लोंढे आणि काँग्रेसला स्वतः काहीच करता येत नसल्यामुळे ते केवळ पोकळ टीकाटिपणी करत आहेत, असा घणाघाती टोला शेलार यांनी लगावला.

शेलार पुढे म्हणाले की, दुष्काळाच्या बाबतीत आमचे सरकार आणि पक्ष अत्यंत संवेदनशील आहे. गरबा आयोजनातून सुरुवातीला १२ लाख आणि आता २० लाख असा एकूण ३२ लाख रुपयांचा धनादेश आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला आहे. येथे निधीपेक्षा भावना महत्त्वाची आहे, याची जाणीव अतुल लोंढेंना नाही. शेतकऱ्यांना देण्यात येणारी पाच हजाराची रक्कम ही केवळ अग्रीम असून ती अंतिम मदत नाही; दुष्काळाची मुख्य भरपाई वेगळी दिली जाणार आहे. फडणवीस सरकारने केलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना मदत मिळत असल्याचे पाहून पोटशूळ उठलेले विरोधक टीका करत आहेत, असा पलटवार त्यांनी केला.

पदवीधर निवडणुकीचा रणसंग्राम तोंडावर असताना काँग्रेस चिखलदऱ्यात मग्न

एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनावर भाष्य करताना शेलार म्हणाले, हे आंदोलन केवळ सत्तापालट आणि राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सुरू आहे. विरोधकांना संविधान मान्य नाही. सरकार पाडण्यासाठी बहुमत लागते, जे त्यांच्याकडे नाही. पुन्हा निवडून येण्याची कोणतीही शक्यता उरली नसल्याने विरोधक आंदोलनाचे नाटक करत आहेत.

सत्याग्रहासाठी ‘सत्याचा’ आग्रह धरावा लागतो; सत्य भाजप आणि देशभक्तांच्या पाठीशी आहे. राहुल गांधी जे मांडत आहेत ते धादांत असत्य असून, त्यांनी कितीही आटापिटा केला तरी जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही, असेही शेलार यांनी ठणकावून सांगितले.

 

error: Content is protected !!