व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण नागपूर पदवीधर निवडणूक, दुबार मतदारांचे भूत मानगुटीवर

नागपूर पदवीधर निवडणूक, दुबार मतदारांचे भूत मानगुटीवर

तब्बल ८,३०० नावे दुबार, प्रशासनाची भूमिका गुलदस्त्यात

Nagpur नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असून, काँग्रेस आणि भाजपसह सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारात जोमाने उतरले आहेत. प्रमुख पक्षांचे जाहीरनामेही प्रसिद्ध झाले आहेत; मात्र या निवडणुकीच्या तोंडावर ‘दुबार मतदारां’मुळे बोगस मतदान होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. पदवीधर निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये तब्बल ८ हजार ३०० मतदारांची नावे दुबार असल्याचे समोर आले असून, यावर अंकुश कसा लावणार याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.

या निवडणुकीसाठी सुमारे अडीच लाख पदवीधरांनी नोंदणी केली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणीसाठी मोठी मोहीम राबवली होती. मात्र, एकाच मतदाराचे दस्तऐवज वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी गोळा करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केल्यामुळे एकाच व्यक्तीची नावे वेगवेगळ्या अर्जांद्वारे नोंदवली गेली, परिणामी दुबार मतदारांचा आकडा वाढला. यावर काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

गँगची पाळेमुळे उखडून टाकू, चिंता करू नका; मुख्यमंत्र्यांचा थेट फोन

दुबार मतदारांच्या नावांसमोर ‘कलरकोड’ करावा आणि यातील एखाद्या मतदाराने मतदान केल्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ इतर केंद्रांना याची माहिती द्यावी, अशी सूचना वंजारी यांनी केली आहे; परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस उपाययोजना जाहीर करण्यात आलेली नाही.

दुसरीकडे, या वादाला जुन्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीचीही किनार आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने भाजपवर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात बोगस नोंदणी झाल्याचा काँग्रेसचा प्रमुख आक्षेप होता.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित करताना कामठी मतदारसंघाचा विशेष उल्लेख केला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढलेले काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी, एकाच फोन नंबरवर आणि एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल शंभर ते दीडशे मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप केला होता.

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पावरून शेतकऱ्यांच्या मागण्या ऐरणीवर; पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रयत्नांची ग्वाही

सध्या मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू असून त्यातून लाखो मतदारांची नावे गाळण्यात आली आहेत. मात्र, या प्रक्रियेवरही काँग्रेसने आक्षेप घेतला असून, प्रशासनाकडून काँग्रेस विचारसरणीच्या लोकांची नावे जाणीवपूर्वक गाळली जात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे दुबार मतदारांचे आव्हान आणि राजकीय पक्षांचे आरोप-प्रत्यारोप यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन निवडणुकीच्या तोंडावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!