व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारल्याने कराळे मास्तर संतप्त

प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारल्याने कराळे मास्तर संतप्त

हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून होत आहे?” असा थेट सवाल

Wardha: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश मिळण्यात अडचणी आल्याचा मुद्दा समोर आला आहे. प्रतिनिधींना प्रवेशासाठी अडवले जात असल्याचा आरोप करत कराळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमच्या प्रतिनिधींना मुद्दाम त्रास का दिला जात आहे? हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून होत आहे?” असा थेट सवाल त्यांनी केला.

स्वतः सह्या करून प्रतिनिधींचे फॉर्म दिल्यानंतरही त्यांना प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कराळे यांनी म्हटले. प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश देण्याची विनंती ते दूरध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांना करत असल्याची ऑडिओ क्लिप त्यांनी समाज माध्यमावर टाकली आहे. सादर केलेल्या सह्यांवर आक्षेप घेतल्याने प्रतिनिधींना आत प्रवेश मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकारामुळे कराळे यांनी नाराजी व्यक्त केली असून, मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

पदवधीरमध्ये ‘योग्य’ उमेदवार निवडून येणार

लोकशाही प्रक्रियेत उमेदवारांच्या प्रतिनिधींना नियमानुसार काम करता आले पाहिजे. प्रतिनिधींनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतरही अडचणी येत असतील, तर त्यामागचे कारण स्पष्ट केले पाहिजे, अशी भूमिका कराळे यांनी मांडली. त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्याबाबत नेमकी कोणती हरकत आहे आणि निर्णय कोणत्या नियमांनुसार घेण्यात आला, याबाबत स्पष्टता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कराळे यांनी केवळ प्रतिनिधींच्या प्रवेशाचाच मुद्दा उपस्थित केला नाही, तर मतपेट्यांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली. मतपेट्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार होऊ नये, यासाठी कडक देखरेख आणि खडा पहारा ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नितेश कराळे हे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाशी संबंधित असलेल्या कराळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली आहे. या निवडणुकीत विद्यमान आमदार आणि भाजपच्या उमेदवारांसह अन्य प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होत असल्याने कराळे यांना मिळणाऱ्या मतांकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खुर्चीसाठी मराठा-ओबीसीत आग लावली, वडेट्टीवार बरसले

दरम्यान, प्रतिनिधींना प्रवेश देण्याबाबत निर्माण झालेल्या वादावर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदान प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी नियमांची पारदर्शक अंमलबजावणी आणि सर्व संबंधितांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!