प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने खळबळ; दुष्काळ, बेरोजगारीवरून सरकारवर निशाणा
Buldhana शेतात पीक येत नाही, रोजगार मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकार सत्तेत कशासाठी बसले आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी, ‘शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका; दहा-बारा पुढारी मारा अन् मग आत्महत्या करा,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. बुलढाणा येथे रविवारी सायंकाळी आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
शहरातील डी.एड. महाविद्यालयासमोरील मैदानावर आयोजित या मेळाव्याला अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देवाच्या नावावर सत्तेत आलेल्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीत काय केले, असा सवाल त्यांनी केला.
शिक्षक आमदार निवडणुकीची मतमोजणी उद्या; दुपारपर्यंत पहिल्या पसंतीचा कौल
दिवाळीनंतर गावागावांत पाण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सत्ताधारी नेत्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांच्या घरासमोर जाऊन त्यांच्याकडे जेवण आणि पाणी मागावे, असे आवाहन केले. राज्यातील धरणांमध्ये सुमारे ३५ टक्के गाळ साचला असल्याचा दावा करत दुष्काळाची शक्यता असतानाही गाळ काढण्याची कार्यवाही का करण्यात आली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकार हे आजच्या काळातील स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचे सांगत मतदारांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा सन्मान केला पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘ज्यांच्यावर भरवसा ठेवला, तेच विश्वासाला पात्र नाहीत’
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवरही टीका केली. भाजपचा खेळखंडोबा झाला असून, जिथे दहा जागा जिंकण्याची ताकद नाही, तिथे दोनशे जागा जिंकल्या जातात, असे ते म्हणाले. भाजप सरकार टिकावे यासाठी काँग्रेस पावले उचलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ज्यांच्यावर विश्वास ठेवला, तेच आता विश्वासाला पात्र राहिले नसून, त्यांनी सुपारी घेतल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. मोदी सरकार आणखी पाच वर्षे सत्तेत राहिल्यास महाराष्ट्रातील सव्वादोन कोटी मतदारांचा बळी जाईल, असा दावाही त्यांनी केला.
दुष्काळ, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.








