शेतकऱ्यांची कामधेनू बंदच; नेत्यांच्या आश्वासनांपलीकडे ठोस कृतीची प्रतीक्षा
Yavatmal : निवडणुका आल्या की राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी धडपड करणारे नेते, सत्तेसाठी मोर्चेबांधणी करणारे राजकीय पक्ष आणि विकासाच्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी यांच्यासमोर वसंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रश्न मात्र अनुत्तरितच असल्याचे चित्र आहे. पंचक्रोशीतील शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि लहान व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेला वसंत सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याने परिसरातील ग्रामीण अर्थकारणाला मोठा फटका बसला आहे. कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवली जाणार की हा विषय केवळ निवडणुकीपुरताच चर्चेत राहणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मुळाव्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंतनगर – पोफाळी येथील या कारखान्याने अनेक वर्षे परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक गाळपाची सुविधा, ऊसतोड कामगारांना रोजगार, वाहतूकदारांना व्यवसाय आणि परिसरातील व्यापाऱ्यांना आर्थिक उलाढालीची संधी मिळवून देणारा हा कारखाना पंचक्रोशीची कामधेनू म्हणून ओळखला जात होता. अनेक राजकीय नेत्यांच्या जडणघडणीतही कारखान्याची भूमिका राहिल्याने तो स्थानिक राजकारणाच्या केंद्रस्थानी होता.
कोण होणार शिक्षक आमदार? पहिल्या पसंतीच्या मतांसाठी दुपारचे चार वाजणार
मात्र, आर्थिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे कारखाना बंद पडल्यापासून या परिसरातील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. ऊस उत्पादकांना गाळपासाठी अन्य कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. वाहतुकीचा खर्च, ऊसतोडणीचे नियोजन आणि गाळपासाठी मिळणारी तारीख या प्रश्नांनाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. कारखाना बंद असल्याचा परिणाम केवळ ऊस उत्पादकांपुरता मर्यादित नसून त्याच्याशी जोडलेल्या अनेक पूरक व्यवसायांवरही होत आहे.
सत्तेच्या समीकरणांसाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेतृत्वाने कारखाना सुरू करण्याच्या प्रश्नावरही तितकीच तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या काळात विकासाचे मुद्दे मांडले जात असताना स्थानिक रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या या कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस प्रयत्न का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गावागावांत मतदार यादीतील घोळाची पोलखोल करणार; काँग्रेसचे अभियान
कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक तरतूद, यंत्रसामग्रीची सद्यस्थिती, गाळप क्षमता, सक्षम व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना वेळेत ऊसबिले देण्याची व्यवस्था याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. केवळ कारखाना सुरू करण्याची घोषणा करून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी व्यवहार्य आराखडा, निधीची उपलब्धता आणि कालबद्ध अंमलबजावणी गरजेची आहे.
एकीकडे सत्तेसाठी राजकीय हालचालींना वेग येत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या रोजगाराशी आणि अर्थकारणाशी निगडित वसंत कारखान्याचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी नेतृत्व कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रत्यक्ष कोणती पावले उचलतात, याकडे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ‘वसंत’ पुन्हा सुरू होणार की राजकीय आश्वासनांमध्येच अडकून राहणार, हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा ठरत आहे.
____








