अदानी-अंबानींना वाचवण्यासाठी ठाकरे बंधू आणि शरद पवार पुढे; दुष्काळावरून प्रकाश आंबेडकरांचा सरकारला आंदोलनाचा इशारा
Washim सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी ५०० रुपये मिळतात, हे माहीत होते; मात्र, पोस्ट डिलीट करण्यासाठीही पैसे मिळतात, हे आता समजले, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. मुंबईतील एका मोठ्या नेत्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट मुंबई पोलिसांकडून किंवा गौतम अदानी यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर डिलीट केल्याचा आरोपही त्यांनी केला. वाशिम येथे बोलताना त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.
सुजात आंबेडकर म्हणाले की, भाजप आणि काँग्रेसचे काही लोक ५०० रुपये घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करतात, कमेंट करतात आणि इतरांना ट्रोल करतात. मात्र, आता पोस्ट डिलीट करण्यासाठीही पैसे दिले जात असल्याचा नवीन प्रकार समोर आला आहे.
कोण होणार शिक्षक आमदार? पहिल्या पसंतीच्या मतांसाठी दुपारचे चार वाजणार
महापालिका निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी आघाडी स्थापन केली होती. या आघाडीपासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगत सुजात आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावरही निशाणा साधला. या आघाडीतील नेत्यांनी गुजराती उद्योजकांच्या विरोधात भूमिका घेतली; मात्र, राज ठाकरे यांचे गौतम अदानी यांच्या घरी जाणे-येणे असते, असा दावा त्यांनी केला.
धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना कसा देता येईल, यासाठी ठाकरे परिवार प्रयत्नशील असल्याचा आरोपही त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या काळात हे नेते एकमेकांच्या घरी जातात. अदानी आणि अंबानी यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार नेहमी पुढे असतात, अशी टीकाही सुजात आंबेडकर यांनी केली.
पाणी-अन्नधान्याची व्यवस्था करा, अन्यथा आंदोलन
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून सरकारला इशारा दिला. राज्यातील परिस्थिती गंभीर असून, दिवाळीनंतर ती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
सरकारने नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि अन्नधान्याची योग्य व्यवस्था केली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हाप्रमुखांच्या आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या घरांसमोर रांगेत उभे राहून जेवण व पाण्याची मागणी करत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
गावागावांत मतदार यादीतील घोळाची पोलखोल करणार; काँग्रेसचे अभियान
मतदानाचे महत्त्व ओळखा
मतदान हा व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रभावी अधिकार आहे. हा अधिकार नागरिकांच्या हातात असेपर्यंत त्यांना कोणीही गुलाम करू शकत नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याची आठवण प्रकाश आंबेडकर यांनी करून दिली.
धर्म आणि देवाच्या नावावर ओबीसींची मते घेण्यात आली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना ओबीसींच्या उरावर बसवण्याचे काम सरकारनेच केले, अशी टीका त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पूर्वी ओबीसी उमेदवार सहज निवडून येत होते; मात्र, यंदा या प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणण्यात आल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.








