याद्यांतील नावांवरून काँग्रेसचा निशाणा; १ नोव्हेंबरच्या महारॅलीची जय्यत तयारी
Gadchiroli : मतदार याद्यांमधील कथित फेरफार आणि मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या मतदानाच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत, ‘मतचोरी’विरोधातील आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत सुरू राहील, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला. या मुद्द्यावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली आयोजित करण्यात आली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी हा भाजपचा धंदा बनला असून, त्याच बळावर निवडणुका जिंकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदार याद्या आणि विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेताना अन्य दोन निवडणूक आयुक्तांना विश्वासात घेतले जात नसल्याचाही दावा त्यांनी केला.
सत्तेसाठी राजकीय धडपड, पण ‘वसंत’ सुरू करण्यासाठी पुढाकार कधी?
देशभरात सुमारे १४ कोटी, तर महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मतदार याद्यांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जाणे लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदार अधिकाऱ्यांचे अधिकार हिरावून घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत आधार असून, मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेमुळे नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस लढा देत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
मतदार याद्यांचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीने १ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली आयोजित केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आमदार बाला बच्चन, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, प्रभारी जिल्हाध्यक्ष पंकज गुद्देवार, रवींद्र दरेकर, अजय कडालवार, पोरेटी, मेश्राम आणि मनोहर रजनीकांत मोटघरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
____








