मतदार यादीतील कथित घोळावर काँग्रेस आक्रमक
Wardha : मतदार यादीतून नावे वगळणे, नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे आणि मतदान केंद्रांमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदारांचे मतदानाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियान राबविण्यात येत असून, हे अभियान गावागावांत आणि प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. नागपूर विभागाच्या केंद्रीय निरीक्षक अमी याज्ञिक यांनी वर्धा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मतदार यादीतील प्रत्येक नोंदीची पडताळणी करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते गावागावांत आणि मतदान केंद्रांच्या स्तरावर जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. मतदार यादीतून नागरिकांची नावे कोणत्या कारणांमुळे वगळली जात आहेत, तसेच मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यामागील नेमकी कारणे काय आहेत, याबाबत निवडणूक यंत्रणेने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी याज्ञिक यांनी केली.
भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी? जयश्री गुट्टे यांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण !
लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा असून, प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाची संधी मिळणे आवश्यक आहे. मात्र, मतदार यादीतील कथित अनियमिततांमुळे पात्र मतदारांच्या अधिकारांवर परिणाम होण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली. या संपूर्ण प्रक्रियेबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांनी जनतेला समाधानकारक उत्तरे द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली. या प्रकरणात पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री संरक्षण देत असल्याचा आरोपही काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
वर्ध्यातील पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, शहराध्यक्ष डॉ. सुधीर पंगुल, डॉ. अभ्युदय मेघे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अरुणा धोते, सोनाली कोपुलवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय निरीक्षकांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी अभियानासंदर्भात आढावा बैठकही घेतल्याची माहिती देण्यात आली.
या अभियानासाठी जिल्ह्यातील सुमारे ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची टीम महिनाभर कार्यरत राहणार आहे. गावपातळीपासून बूथ स्तरापर्यंत मतदारांची माहिती गोळा करणे, मतदार यादीतील नोंदी तपासणे आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमात पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
दरम्यान, विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा याज्ञिक यांनी केला. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत मोठी वाढ झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा निवडणुकीच्या काळात ३३ लाख मतदारांची वाढ नोंदविण्यात आली, तर त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा ३९ लाखांवर पोहोचल्याचा दावा करण्यात आला. मतदारसंख्येतील या बदलामागील कारणे स्पष्ट झाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांवर निर्बंध लादले जात आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडू नका !
मतदार यादीतील कथित अनियमिततांची पडताळणी करून मतदारांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे काँग्रेसने सांगितले. या मोहिमेतून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुढे आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.








