अन्यथा रस्त्यावर उतरू, महाविकास आघाडीचा इशारा
Umarkhed : दुष्काळी परिस्थिती, सिंचनासाठी पाण्याची टंचाई, अनियमित वीजपुरवठा, प्रलंबित पीकविमा आणि अनुदानाच्या प्रश्नांमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्यांच्यावर निर्बंध लादले जात असतील, तर ते अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
उमरखेड तालुक्यातील अनेक शेतकरी हळद, तूर, भाजीपाला आणि फळबागांच्या लागवडीवर अवलंबून आहेत. या पिकांना नियमित पाणीपुरवठा आवश्यक असताना नवीन बोअरवेल आणि विहिरी खोदण्यावरील निर्बंधांमुळे सिंचनाची पर्यायी व्यवस्था उभारण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सरसकट निर्बंध लादण्याऐवजी आवश्यक नियम व अटींच्या अधीन राहून शेतकऱ्यांना नवीन बोअरवेल आणि विहिरी खोदण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतीसाठी वीजपुरवठा हा देखील महत्त्वाचा प्रश्न असून, शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या सरसकट तोडण्याची कारवाई थांबवावी आणि शेतीसाठी नियमित व पुरेशा दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आघाडीने केली. पैनगंगा प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा सिंचनासाठी प्रभावी वापर करावा, अशी भूमिका मांडण्यात आली.
दुष्काळी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, पात्र लाभार्थ्यांचे मंजूर अनुदान तातडीने वितरित करावे, तसेच मागील आणि चालू वर्षाचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. याशिवाय मायक्रोफायनान्स कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांकडून होणारी बेकायदेशीर सक्तीची कर्जवसुली रोखून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही नमूद करण्यात आले.
वंजारी-कोहळे यांच्यात कांटे की टक्कर; कराळे गुरुजींची दुसरी पसंती ठरणार किंगमेकर
या निवेदनावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सभापती तातू देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक राम देवसरकर, नगरसेवक गोपाल अग्रवाल, दत्ताराव शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल कदम, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ॲड. बळीराम मुटकुळे, उपनगराध्यक्ष जुबेर कुरेशी, माजी सभापती संदीप ठाकरे, राजेश कवाने, नगरसेवक गजानन रासकर, नगरसेवक गणेश खंदारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्वप्निल कनवाळे, आरोग्य सभापती वीरेंद्र खंदारे, संतोष जाधव, गजानन भारती महाराज, प्रेमराव वानखेडे, दर्शन भंडारी, गौतम दवणे, दत्ताराव कदम आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सिंचन, वीज, पीकविमा आणि आर्थिक मदतीच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा निवेदनातून देण्यात आला.








