अमरावती शिक्षक मतदारसंघ: बंडाळीचा फायदा उठवण्यात काँग्रेस अपयशी
Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत बंडखोरीचा फायदा उठवण्यात काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे. विरोधकांसह स्वपक्षातील बंडखोरांच्या तगड्या आव्हानाचा एकाकी सामना करत शिंदे सेनेचे (महायुती) उमेदवार किरण सरनाईक यांनी तब्बल ४ हजार ५५५ मतांची निर्णायक आघाडी घेत विजयाच्या उंबरठ्यावर धडक मारली आहे.
२१ व्या बाद फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार किरण सरनाईक १० हजार ६७२ मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीच्या अदिती पोहरे ६ हजार ११७ मते मिळवून दुसऱ्या स्थानावर, तर माजी आमदार व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे ५ हजार ८८१ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. सरनाईक यांनी मिळवलेली आघाडी एवढी मोठी आहे की त्यांचा विजय आता पक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्याविरोधात सर्व बाजूंनी घेराबंदी करण्यात आली होती. एका बाजूला स्वपक्षातील बंडखोर माजी आमदार श्रीकांत देशपांडे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे सेना आणि भाजप बंडखोरांचे तगडे आव्हान होते. तरीही या सर्वांचा सामना करत सरनाईक यांनी मिळवलेली ही दणदणीत आघाडी अमरावती विभागातील शिक्षकांमध्ये असणारे त्यांचे मजबूत नेटवर्क आणि ताकद सिद्ध करणारी ठरली आहे.
दुसरीकडे, पुण्यात शिंदे सेनेने महायुतीच्या विरोधात उमेदवार उतरवल्यानंतर अमरावतीमध्ये भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांना छुपा पाठिंबा देण्यात आल्याची चर्चा होती. खासदार भाऊ आणि भाजपची यंत्रणा सोबत असूनही संगीता शिंदे निवडणुकीच्या शर्यतीत तग धरू शकल्या नाहीत.
भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी? जयश्री गुट्टे यांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण !
मात्र, सत्ताधारी गोटात एवढी बंडाळी आणि मते फुटण्याची चिन्हे असतानाही त्याचा राजकीय फायदा उचलण्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार अदिती पोहरे यांना पूर्णपणे अपयश आले. माजी आमदार हर्षवर्धन देशमुख यांची ताकद आणि ‘श्री शिवाजी शिक्षण संस्था’ सोबत असतानाही पोहरे यांना अपेक्षित मते मिळवता आली नाहीत. या निकालाच्या कौलावरून अमरावती जिल्ह्यात आता काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणि प्रभाव कमालीचा घटल्याचे स्पष्ट झाले आहे. अंतिम औपचारिकता बाकी असली तरी किरण सरनाईक यांचा विजय निश्चित झाला आहे.








