नागपूर पदवीधरमधील निष्ठावंताची अनोखी नाराजी, राबवला अवैध मतांचा पॅटर्न
नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघातील सलग दुसऱ्या पराभवाने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, पक्षांतर्गत उणीदुणी आणि अंतर्गत संघर्षाचे पदर आता पूर्णपणे उघडे पडू लागले आहेत. भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. तिकीट देण्यापासून ते थेट निवडणूक प्रभारी म्हणून सर्व सूत्रे आपल्याच हातात ठेवण्यापर्यंतची त्यांची भूमिका अनेकांना खटकत होती. अखेर हीच सल आणि नाराजी मतपत्रिकेतून कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची चर्चा आता भाजपच्या वर्तुळात जोरदार रंगली आहे.
या निवडणुकीच्या संपूर्ण राजकीय प्रवासात कोहळे यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला असंतोष, नेत्यांचा हट्ट आणि कार्यकर्त्यांनी वापरलेले गुप्त अस्त्र या सर्वांचा प्रवास अतिशय रंजक राहिला आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार असलेले अनिल सोले या निवडणुकीसाठी उत्सुक होते. असे असतानाही ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून सुधाकर कोहळे यांना आधी नोंदणीप्रमुख आणि नंतर थेट उमेदवार बनवण्यात आले. सहा जिल्ह्यांची एवढी मोठी निवडणूक असताना नेहमीप्रमाणे कोणतीही प्राथमिक सर्वेक्षणाची प्रक्रिया राबवली गेली नाही, किंवा पक्षाच्या संसदीय समितीसमोर नावे ठेवून औपचारिक चर्चाही केली गेली नाही. सर्व सोपस्कार आणि पक्षाचे धोरण बाजूला सारत कोहळेंचे नाव थेट लादण्यात आले, ही बाब अनेक ज्येष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अजिबात पटली नाही.
ईव्हीएमवर आरोप, मतपत्रिकेवरही पराभव; काँग्रेसच्या दाव्यांतील विरोधाभास उघड !
या निर्णयाविरोधात माजी आमदार अनिल सोले यांनी थेट उमेदवारी अर्ज भरत बंडाचा झेंडा फडकवला. त्यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते उघडपणे समोर आले. माजी आमदार गिरीश व्यास यांनी आपले कार्यालय सोले यांच्यासाठी खुले करून दिले आणि कुणीही आरोप करण्यापूर्वी पक्षाचा राजीनामा दिला. सोले यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणेही टाळले. वातावरण तापल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नागपूर गाठून सोले यांची घरी जाऊन भेट घेतली. आमची चूक झाली, यापुढे पक्षाच्या नियमांनुसार प्रक्रिया पार पाडली जाईल आणि ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांना अडगळीत टाकले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे सोले आणि व्यास यांचे वैयक्तिक समाधान झाले असले, तरी तळागाळातील कार्यकर्त्यांमधील धुमसत असलेला रोष कायम राहिला.
पहिल्या पसंतीच्या मोजणी फेरीत कोहळे सुमारे पाच हजार मतांच्या फरकाने आघाडीवर होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे तब्बल साडेनऊ हजारहून अधिक मते अवैध ठरली. पदवीधर मतदारांनी त्यांच्या नावापुढे जाणीवपूर्वक चुकीचा म्हणजेच ‘दोन’चा आकडा लिहून आपली मते बाद केल्याची आणि याद्वारे तीव्र रोष व्यक्त केल्याची चर्चा आहे. जर ही मते वैध ठरली असती, तर कोहळे यांची आघाडी पंधरा ते सोळा हजारांवर पोहोचली असती आणि दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत ते सहज विजयी झाले असेते. मात्र, अवघ्या साडेतीन हजार मतांच्या फरकाने झालेल्या या पराभवात अवैध मतांचा हा पॅटर्न कोणीतरी जाणीवपूर्वक घडवून आणल्याचे स्पष्ट होते. यावर कारणे दाखवा नोटीस, कारवाई किंवा नुसती चर्चा झाली तरी, हा मतदारसंघ भाजपला पुढील सहा वर्षांसाठी गमवावा लागला हे वास्तव नाकारता येत नाही.
विदर्भात भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा महायुतीला फटका? आनंद परांजपेंचा सवाल
राजकीय वर्तुळात सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होत आहे की, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुधाकर कोहळे यांच्यावर एवढे प्रेम का उतू चालले आहे. दक्षिण नागपूरचे माजी आमदार असलेल्या कोहळे यांना बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नागपूर ग्रामीणमध्ये नेले आणि जिल्हाध्यक्ष केले. त्यांना सावनेर किंवा काटोल मतदारसंघातून लढण्याची ऑफर देण्यात आली होती, पण ग्रामीणमधून लढण्यास स्पष्ट नकार देत त्यांनी केवळ दक्षिण नागपूर किंवा थेट विधानपरिषदेचे तिकीट मागितले. त्यानंतर पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना ऐनवेळेवर तिकीट देण्यात आले, जिथे ते पाच हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. या पराभवानंतरही तत्काळ त्यांना पदवीधर मतदारसंघाचे आश्वासन देण्यात आले.
पराभवाचीच मोठी चर्चा; कराळे मास्तरांनी पदवीधरांच्या राजकारणात नवा ‘अंक’ मांडला!
एकाच व्यक्तीचे वारंवार एवढे लाड का केले जात आहेत, असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांमधून विचारला जात होता. परंतु, कोहळेंना कोणत्याही परिस्थितीत आमदार करायचेच असा चंग बावनकुळे यांनी बांधला होता. मुरब्बी व धोरणी असणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हा हट्ट पुरवल्यामुळे सर्वांचाच नाईलाज झाला. शेवटी, नेत्यांच्या या एकतर्फी निर्णयाला आणि उमेदवारी लादण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीतील सर्वात मोठे आणि गुप्त अस्त्र गुप्त मतदान याचा वापर केल्याचे दिसून आले. आम्हाला गृहीत धरू नका आणि आमच्यावर उमेदवार लादू नका, असा सज्जड व स्पष्ट संदेश निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना दिला आहे.








