व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण यवतमाळ जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा; काँग्रेसची २६ वर्षांची सत्ता संपुष्टात, संजय...

यवतमाळ जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा; काँग्रेसची २६ वर्षांची सत्ता संपुष्टात, संजय देशमुख अध्यक्षपदी बिनविरोध

 

महायुतीच्या हाती सहकार क्षेत्राची सूत्रे; भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीचे विजय जाधव उपाध्यक्षपदी

Yavatmal : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात दीर्घकाळ प्रभाव राखणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात ऐतिहासिक बदल झाला आहे. तब्बल २६ वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच शिवसेनेचा (शिंदे गट) नेता विराजमान झाला आहे. खासदार संजय देशमुख यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने जिल्ह्याच्या सहकार राजकारणात शिवसेनेने आपले स्थान अधोरेखित केले आहे. काँग्रेसने अध्यक्षपदासाठी उमेदवार न दिल्याने ही निवड बिनविरोध पार पडली. सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने जिल्हा बँकेवर मिळविलेल्या विजयाचे हे पुढचे राजकीय पाऊल मानले जात आहे. अध्यक्षपद शिवसेनेकडे, तर उपाध्यक्षपदांपैकी प्रत्येकी एक पद भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देण्यात आले. भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीचे विजय जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे सत्तेतील तिन्ही घटक पक्षांना बँकेच्या पदाधिकारी मंडळात स्थान मिळाले आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुतीप्रणित बळीराजा सहकार पॅनलने २५ पैकी १६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे सात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन असे नऊ संचालक आहेत. या निकालाने काँग्रेसच्या दीर्घकालीन वर्चस्वाला धक्का बसला आणि बँकेची सत्ता महायुतीकडे आली.

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी लाचार! अमित शहांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर घणाघात

 

महायुतीच्या अंतर्गत सत्तावाटपात शिवसेनेचे सात, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आणि भाजपचे तीन संचालक निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. अखेर सर्वाधिक सात संचालक असलेल्या शिवसेनेने अध्यक्षपद मिळविले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील राजकीय समीकरणांना या निर्णयामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दिग्रस तालुका गटातून संचालकपदी बिनविरोध निवडून आलेले खासदार संजय देशमुख यांनी अध्यक्षपदाच्या निवडीतही बिनविरोध बाजी मारली. त्यामुळे संचालकपदापासून अध्यक्षपदापर्यंत त्यांची निवड निर्विरोध झाली आहे. महागाव तालुका गटातून निवडून आलेले नितीन भुतडा आणि पुसद तालुका गटातून बिनविरोध आलेले विजय जाधव यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

अमरावती जिल्हा बँकेचे संचालक न्यायालयात जाणार!

महायुतीतील तिन्ही पक्षांना पदाधिकारी मंडळात स्थान मिळाले असले, तरी संचालक मंडळातील सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. कुणबी आणि मराठा समाजाचे १६ संचालक निवडून आले असताना उपाध्यक्षपदांवर या समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने काही संचालकांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नव्या सत्ताधारी गटात भविष्यात हे समीकरण कसे हाताळले जाते, याकडे लक्ष राहणार आहे.

 

राजकीय सत्तांतर झाले असले, तरी नव्या संचालक मंडळासमोर बँकेची आर्थिक घडी मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे. वाढता अनुत्पादित कर्जाचा बोजा (एनपीए), आर्थिक शिस्त, ठेवीदारांचा विश्वास आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर नव्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. २६ वर्षांच्या सत्ताबदलानंतर बँकेच्या कारभारात कोणते धोरणात्मक बदल होतात आणि त्याचा शेतकरी सभासदांना किती लाभ मिळतो, यावरच या ऐतिहासिक सत्तांतराचे यश ठरणार आहे.

____

 

error: Content is protected !!