सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे झाले भावूक!
Pune: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे त्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. अपघाताचा अहवाल लवकरात लवकर सादर करून दुर्घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली.
अजित पवार यांच्या अपघाताबाबत जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळणे आवश्यक आहे. चौकशीचा अहवाल लवकर यावा, यासाठी आपण अमित शाह यांनाही विनंती केली आहे. या दुर्घटनेत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात राजकीय आणि भावनिक वातावरणाबरोबरच अपघाताच्या चौकशीचा मुद्दाही चर्चेचा विषय ठरला.
तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा आखाडा तापला १२ जागांसाठी २६ उमेदवार!
अजित पवार यांच्या आठवणी सांगताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या. ज्या पुणे जिल्हा परिषदेसाठी अजितदादांनी आपले आयुष्य वेचले, त्याच परिसरात आज त्यांचा पुतळा उभारला जात आहे, हे त्यांच्या कार्याचे खरे प्रमाणपत्र असल्याचे त्या म्हणाल्या. छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून जिल्हा परिषद, आमदारकी आणि खासदारकीपर्यंतचा प्रवास करताना अजितदादांचे मातीशी असलेले नाते कधीच बदलले नाही. जनसेवा, जनकल्याण आणि विकासासाठी त्यांनी सातत्याने काम केले. शेतकरी, सहकार आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर त्यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. एखादा विषय हाती घेतल्यानंतर तो मार्गी लागेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती होती, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
अमित शाह यांनी अजितदादांप्रती दाखवलेल्या जिव्हाळ्याबद्दल त्यांनी आभार मानले. दादांच्या निधनानंतर सर्वांकडून आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक सहकार्य मिळत असल्याचे सांगतानाही त्या भावूक झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण अधोरेखित केले. अजितदादा हे केवळ पुतळ्याच्या चौकटीत सामावणारे व्यक्तिमत्त्व नव्हते. त्यांनी आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांनी तब्बल अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, असे शिंदे म्हणाले.
‘फणस काटेरी असतो, पण आतून मधाळ असतो, तसेच अजितदादा होते,’ अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्या स्वभावाचे वर्णन केले. २८ जानेवारीचा अपघात हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता. त्या घटनेने मनाला मोठा धक्का बसला, असे सांगताना शिंदे यांनाही गहिवरून आले.
स्वतंत्र शेतकरी आयोगाच्या स्थापनेसाठी मुनगंटीवारांचे पहिले पाऊल, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या शिस्तप्रिय, स्पष्टवक्त्या आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचे स्मरण केले. पुण्याबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती. विकासकामांमध्ये गुणवत्तेशी कोणतीही तडजोड त्यांना मान्य नव्हती. एखादे काम योग्य वाटले तर त्यासाठी ठामपणे उभे राहणे आणि न पटणाऱ्या गोष्टींना स्पष्टपणे नकार देणे, ही त्यांची खासियत होती. राजकारणात थेट भूमिका मांडण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते; मात्र अजितदादांकडे ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोनच शब्द होते, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील त्यांचे नेतृत्व अधिक बहरत असतानाच त्यांची एक्झिट झाली, ही मोठी हानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमातून अजित पवार यांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या आठवणी आणि अपघाताच्या चौकशीबाबतची मागणी या तिन्ही मुद्द्यांनी राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.








