वडगाव आणि शेंडेश्वर डॅमच्या कालव्यांमधून पाणी मिळावे यासाठी आंदोलनाचा इशारा
Hinganghat : रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असताना वडगाव डॅम आणि शेंडेश्वर डॅमच्या कालव्यांमधून अद्याप पाणी सोडण्याबाबत ठोस नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे हिंगणघाट, समुद्रपूर आणि सिंदी रेल्वे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी दोन्ही धरणांच्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाला दिला आहे.
या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. रब्बी हंगाम सुरू झाल्याने गहू, हरभरा, चणा आणि भाजीपाला यांसह विविध पिकांच्या पेरणीसाठी तसेच पिकांच्या वाढीसाठी नियमित सिंचनाची गरज आहे. मात्र, कालव्यांद्वारे पाणी सोडण्याचे वेळापत्रक निश्चित नसल्याने पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वडगाव धरणाच्या सिंचन व्यवस्थेवर सिंदी रेल्वे, विखणी, डिग्रज, भोसा, गौळ, पळसगाव, मार्डा, कळमना आणि सालापूर या गावांतील शेतकरी अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे वडगाव व शेंडेश्वर धरणाच्या पाणीपुरवठ्यावर हिंगणघाट, समुद्रपूर, सुलतानपूर, उमरी, सातेफळ, येनोरा, रिमडोह, बुरकोनी, चिंचोली, पारडी, मानोरा, दहेगाव, हळदगाव, रेनकापूर, कारडा, जाम, औरंगपूर, शेंडेश्वर, बेला, कांढली, आजदा आणि शेडगाव परिसरातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मशागत आणि पेरणीसाठी मोठा आर्थिक खर्च केला आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या महत्त्वाच्या वाढीच्या टप्प्यावर पाणी उपलब्ध झाले नाही, तर उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोअरवेलसारखी पर्यायी सिंचन व्यवस्था नसल्याने त्यांना पूर्णपणे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.
प्रशासनाने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून पाटबंधारे आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घ्यावी. कालव्यांमधून पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे आणि कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने पाणी मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, विधानसभा अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, सुनील डोंगरे, अशोक वांदिले, विनोद वानखेडे, आशिष देवतळे, मिलिंद कोपुलवार, प्रशांत घवघवे, गौतम कोठारी, अनिल बुलानी, विजय शर्मा, संजय नेहरोत्रा, शेखर जाधव, मारोती महाकाळकर, मोहम्मद अली अजाणी, जितेंद्र कुकसे, दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, गजानन शेंडे आदी उपस्थित होते.
गडचिरोलीत नक्षलवाद संपला आता जिल्ह्याला विकासाच्या पहिल्या रांगेत आणणार!
याशिवाय नगरसेविका ज्योत्स्ना तडस, दुर्गा बेलखोडे, गणेश वैरागाडे, नगरसेवक जगदीश बोरकर, सुभाष चौधरी, श्रीकांत भगत, संतोष तिमांडे, प्रवीण श्रीवास्तव, महादेव वांदिले, अजय परबत, राजू मेसेकर, आशिष जाधव, प्रवीण कलोडे, गुणवंतराव कारवटकर, सुनील भोमले, बंटी बेलखोडे, नितीन भुते यांच्यासह समुद्रपूर व सिंदी रेल्वे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.








