Rally for ‘Beti Bhacho’ message : रॅलीतून दिला ‘बेटी बचाव’चा संदेश; ८ मार्चपर्यंत चालणार अभियान
Nagpur भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. शतकाच्या दिशेने वाटचालही सुरू केली. पण अजूनही समाजात बेटी बचाओचा संदेश द्यावा लागतो, हे दुर्दैव आहे. दरवर्षी सरकारी आणि सामाजिक संस्थांच्या वतीने अभियान राबविले जाते. अलीकडेच हा संदेश देण्यासाठी एक हजार शाळकरी विद्यार्थी मैदानात उतरले. त्यांचे हे अभियान ८ मार्चपर्यंत चालणार आहे.
बालकांसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणांना बाल संरक्षण कायद्याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. हे प्रशिक्षण जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत हे सुरू आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्ष व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. बेटी बचाव बेटी पढाव दशपूर्ती सोहळ्यानिमित्त रॅली काढण्यात आली.
कामठी शहरातील अब्दुल सत्तार फारुकी शाळा नगरपरिषद शाळा व इतर शाळेतील १ हजार मुला-मुलींनी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. बेटी बचाव बेटी पढाव या महिला बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अभियानाला २२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. ८ मार्चपर्यंत हे अभियान चालणार आहे.
बेटी बचाव बेटी पढाव तसेच मुलांचे अधिकार व संरक्षण या विषयावर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यांमध्ये उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिन पाटील उपस्थित होते. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अशी शपथ रॅलीत सहभागी झालेल्यांनी घेतली.
Youth Congress Controversy : पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी पोहोचली दिल्लीत!
यावेळी जिल्हा महिला बालविकास अधिकारी रंणजितत कुऱ्हे, अध्यक्ष बालकल्याण समितीच्या अध्यक्ष छाया राऊत, बाल विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत तोडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी अंजली निंबाळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, जिल्हा बाल रक्षक समन्वयक प्रसन्नजीत गायकवाड, बाल संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, चाइल्ड लाइन प्रतिनिधी मीनाक्षी धडाडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या जिल्हा समन्वय सायना शेख, नगरपरिषद मुख्याध्यापक मुजीब नकीब, केंद्रप्रमुख विनोद गजबे, अनुप देशमुख आदी उपस्थित होते.








