व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण पालकमंत्रिपदासाठी ताई-दादांची फिल्डिंग!

पालकमंत्रिपदासाठी ताई-दादांची फिल्डिंग!

 

स्थानिक आमदाराला संधी मिळण्याच्या चर्चेने इच्छुक सक्रिय; समर्थकांकडूनही आपापल्या नेत्याची हवा

Amravati अमरावतीचे पालकमंत्रिपद जिल्ह्यातील स्थानिक आमदारालाच मिळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अमरावतीकरांकडून व्यक्त होणाऱ्या या अपेक्षेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. समाजमाध्यमांवरही सध्या याच विषयाची चांगलीच हवा आहे. त्यात जिल्ह्यातील आमदारालाच पालकमंत्रिपदाची संधी मिळणार असल्याच्या चर्चेने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परिणामी, सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी आतापासूनच आपापल्या परीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

या संभाव्य शर्यतीत ताई आणि दादा यांची नावे विशेष चर्चेत आहेत. यामध्ये सुलभा खोडके, रवी राणा, प्रवीण पोटे आणि बच्चू कडू यांची नावे चर्चेमध्ये आघाडीवर आहेत. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी आपापल्या नेत्याच्या नावाची हवा करण्यास सुरुवात केली आहे. कुणी आपल्या नेत्याच्या राजकीय अनुभवाचा दाखला देत आहे, तर कुणी पक्षातील त्यांचे वजन आणि वरिष्ठांशी असलेले संबंध अधोरेखित करीत आहे. काही समर्थक तर आपल्या नेत्यालाच पालकमंत्रिपदासाठी सर्वाधिक योग्य असल्याचे सांगत राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अमरावतीत ‘गोरे विरुद्ध ठाकूर’ राजकीय कलगीतुरा!

विशेष म्हणजे, अद्याप पालकमंत्रिपदाबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसतानाही समर्थकांच्या गोटात मात्र दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आपापल्या नेत्याच्या नावाची चर्चा वरिष्ठांपर्यंत पोहोचावी, यासाठीही पडद्यामागून प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मात्र, पालकमंत्रिपदाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींकडेच असल्याने सध्या इच्छुकांना प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ताईंचा अनुभव कामी येणार की दादांचे पक्षातील वजन निर्णायक ठरणार, यावर राजकीय चर्चांचे फड रंगू लागले आहेत. समर्थकांनी कितीही हवा केली, तरी पालकमंत्रिपदाची खुर्ची नेमकी कुणाच्या वाट्याला येते, हे वरिष्ठांच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

error: Content is protected !!