व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चापूर्वीच शरद पवार गटाचा मोठा डाव

रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चापूर्वीच शरद पवार गटाचा मोठा डाव

सर्व जिल्हाध्यक्षांना २६ नोव्हेंबरला मुंबईत पाचारण

Nagpur : आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘शेगाव ते नागपूर’ ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा केली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सर्व जिल्हाध्यक्षांना २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत तातडीच्या बैठकीसाठी बोलावले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे रोहित पवार यांच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमदार रोहित पवार यांनी ३ ते ९ डिसेंबर दरम्यान शेगाव ते नागपूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. मात्र, या आंदोलनाची कोणतीही पूर्वकल्पना पक्ष नेतृत्वाला दिली नसल्याचे समोर आले आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या मोर्चाबाबत आपल्याला माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसेच, सरकारविरोधात काढण्यात येणाऱ्या या मोर्चामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊ नये, अशा अंतर्गत सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

‘मग डीपीसी आणि जिल्हा परिषदाच रद्द करा, सगळे निर्णय राज्यातूनच घ्या!’

रोहित पवार यांनी आंदोलनाची घोषणा करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेला नागपूर जिल्हाध्यक्ष सलील देशमुख, नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि वर्धेचे खासदार अमर काळे उपस्थित होते. आता पक्षानेच २६ नोव्हेंबरला मुंबईत जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावल्याने या नेत्यांची मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पक्षाच्या वतीने बोलावण्यात आलेल्या या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. महायुती सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना या बैठकीत जिल्हाध्यक्षांना दिल्या जाणार असून, त्यानंतर सरकारकडे अधिकृत मागणी केली जाईल.

महायुती सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत पडलेली नाही. केवळ पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम देऊन सरकार शेतकऱ्यांची बोळवण करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच मुद्द्यावरून आता पक्ष पातळीवर स्वतंत्र रणनीती आखली जात असल्याचे दिसत आहे.

 

error: Content is protected !!