व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘मग डीपीसी आणि जिल्हा परिषदाच रद्द करा, सगळे निर्णय राज्यातूनच घ्या!’

‘मग डीपीसी आणि जिल्हा परिषदाच रद्द करा, सगळे निर्णय राज्यातूनच घ्या!’

 

सतेज पाटील संतप्त; गोकुळच्या वादावरही चंद्रकांत पाटील – मुश्रीफांना धरले धारेवर

Mumbai: कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीवाटपावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीनुसारच व्हावी असे वाटते. जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीवरही आमदार आणि मंत्र्यांकडून हक्क सांगितला जात असेल, तर जिल्हा नियोजन समित्या आणि जिल्हा परिषदाच रद्द करा. राज्यात बसून तुम्हीच सर्व निधीवाटप आणि विकासकामांचे नियोजन करा, असा संतप्त टोला सतेज पाटील यांनी लगावला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डीपीडीसीचा निधी हा जिल्ह्यातील विकासकामांसाठी असून त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांचा महत्त्वाचा वाटा असला पाहिजे, अशी भूमिका सतेज पाटील यांनी मांडली. जिल्हा परिषद सदस्य आपल्या मतदारसंघातच निधी खर्च करणार असतील, तर आमदार आणि खासदारांनी त्यात वाटा मागण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारकडून निधीवाटप करताना राजकीय दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पालकमंत्र्यांकडून डीपीसी निधीचे ७०:३० प्रमाणात वाटप करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाला जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या १७ सदस्यांसह सत्ताधारी गटातील ३० सदस्यांनीही विरोध दर्शवला आहे, असे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन जिल्ह्यातच व्हावे, या उद्देशाने जिल्हा नियोजन समित्या अस्तित्वात आल्या. मात्र, निधी कसा खर्च करायचा हेही सरकारनेच ठरवायचे असेल, तर स्थानिक नियोजन यंत्रणांचे महत्त्व काय उरते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

वंचितला भाजपची ‘बी-टीम’ म्हणणाऱ्यांचे पवार-सुळेंवरील मौन का?

गोकुळच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरात लावण्यात आलेल्या बॅनरवरूनही सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘सतेज पाटलांना दादा कळाले नाहीत,’ अशा आशयाच्या बॅनरबाबत विचारले असता, चंद्रकांतदादा मला चांगलेच कळाले आहेत. ते कोल्हापूरकरांनाही कळाले आहेत आणि महाराष्ट्रालाही कळाले आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षावर बोलताना सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले. गोकुळच्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सरळपणे पार पडू शकली असती. मात्र, जाणीवपूर्वक ‘डेडलॉक’चा मुद्दा पुढे करून संभ्रम निर्माण करण्यात आला, असा दावा त्यांनी केला.

पालकमंत्रिपदासाठी ताई-दादांची फिल्डिंग!

महायुतीचे १२ संचालक उपस्थित राहिले असते, तर कोरम पूर्ण झाला असता. मात्र, त्यांच्यासोबत चार बॉडीगार्ड पाठवून बहुमत मिळवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. गोकुळवर सरकारी संचालक आणण्याच्या प्रक्रियेला चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ हे दोघेच कारणीभूत असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले. संबंधित कायदा मंजूर होऊ नये, यासाठी सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांचे आपल्याला फोन आले होते, असा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

डीपीसी निधीवाटप आणि गोकुळमधील सत्तासंघर्ष या दोन्ही मुद्द्यांवरून सतेज पाटील यांनी सरकारमधील नेत्यांना लक्ष्य केल्याने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात या विधानांची चर्चा सुरू झाली आहे.

____

 

error: Content is protected !!