व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण रोहित पवार स्वतःला राष्ट्रीय नेते समजू लागले आहेत, सुप्रिया सुळेंना खटकतंय; परिणय...

रोहित पवार स्वतःला राष्ट्रीय नेते समजू लागले आहेत, सुप्रिया सुळेंना खटकतंय; परिणय फुके यांचा दावा

सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचा दावा

Nagpur राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात सध्या सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असून, पक्षातूनच विरोध झाल्याने रोहित पवार तोंडघशी पडले आहेत, असा थेट आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. रोहित पवार हे स्वतःला राष्ट्रीय नेता समजू लागले असून, पक्षाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी पक्ष कार्यालयातून विदर्भासह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना फोन करून २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील बैठकीला हजर राहण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे असा दावाही फुके यांनी केला.

आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ३ ते ९ डिसेंबर दरम्यान ‘शेगाव ते नागपूर’ ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा केली आहे. मात्र, या आंदोलनाची कोणतीही कल्पना पक्ष नेतृत्वाला दिली नसल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर, रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेतील बॅनरवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटोही नव्हते. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या मोर्चाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षात मोठा अंतर्गत कलह उफाळून आल्याचे चित्र आहे.

निवडणुकांची वाट न पाहता दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावा!

रोहित पवार यांच्या परस्पर निर्णयाला लगाम घालण्यासाठी आणि सरकारविरोधातील या मोर्चामध्ये पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊ नये, यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीची पावले उचलली आहेत. मुंबईतील पक्ष कार्यालयातून विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून २६ नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले नागपूर जिल्हाध्यक्ष सलील देशमुख, नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि वर्धेचे खासदार अमर काळे यांची यामुळे मोठी राजकीय कोंडी झाली आहे.

दरम्यान, २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील बैठकीत महायुती सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्षांना दिल्या जाणार आहेत. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप मदत दिलेली नाही; केवळ पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या मुद्द्यावरून आता रोहित पवारांना बाजूला सारून पक्ष पातळीवर स्वतंत्र रणनीती आखली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

error: Content is protected !!