व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र दुष्काळानंतर जाग आली; कायमस्वरूपी उपायांसाठी ‘पूल तिथे बंधारा’!

दुष्काळानंतर जाग आली; कायमस्वरूपी उपायांसाठी ‘पूल तिथे बंधारा’!

प्रत्येक नव्या पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडविणार; जलसंधारणाचे जाळे निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय

Akola : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलासोबत बंधारा उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘पूल तिथे बंधारा’ (Bridge-Cum-Barrage) या संकल्पनेतून स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, नैना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नदी व नाल्यांवर बांधण्यात येणाऱ्या पुलांनाही हे धोरण लागू राहणार आहे.

१५ डिसेंबरपूर्वी संसदेचे अधिवेशन? पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश!

महामार्गांवरील पुलांच्या बांधकामातही ‘पूल वजा बंधारा’ ही संकल्पना राबविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी स्थानिक पातळीवर अडवून त्याचा साठा निर्माण करणे शक्य होणार आहे. परिणामी, भूजल पातळी वाढण्यासह विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होऊ शकते.

याशिवाय, मोठ्या धरणांचे आणि तलावांचे खोलीकरण, तलावांमधील गाळ काढून त्याचा रस्ते बांधकामासाठी उपयोग करण्यासंदर्भातही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने हे धोरण आखले आहे. स्थानिक स्तरावर जलसाठ्यांचे जाळे निर्माण करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.

 

error: Content is protected !!