दुष्काळ आणि पाणीटंचाईवर ठोस निर्णयांने मदत की फक्त आश्वासनांचा पाऊस
Washim : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशिम दौरा अखेर निश्चित झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह दुष्काळ निवारण आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर ते प्रशासकीय यंत्रणेशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्यांच्या पदरी दिलासादायक निर्णय पडणार की पुन्हा आश्वासनांचीच खैरात होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करीत आहेत. पिकांचे नुकसान, आर्थिक अडचणी, पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन प्रभावित झाले आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे. यापूर्वी पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जिल्ह्यात आले होते. मात्र, पाहणीनंतर अपेक्षित मदत आणि उपाययोजना प्रत्यक्षात दिसून आल्या नसल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याबाबत व्यक्त झालेल्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कितपत गांभीर्याने दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. केवळ प्रशासकीय आढावा घेण्यापलीकडे जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना आणि दुष्काळ निवारणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत ठोस निर्णय होणे आवश्यक आहे.
दौऱ्यानिमित्त जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल, अधिकाऱ्यांकडून आकडेवारी सादर केली जाईल आणि विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. मात्र, या बैठकीतून प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य निर्णय किती निघतात, हा खरा कस असणार आहे.
पालकमंत्र्यांचा दौरा संपल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना आश्वासनांच्या प्रतीक्षेत राहावे लागणार का, की यावेळी त्यांच्या समस्यांवर ठोस तोडगा निघणार, हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी जिल्ह्यात प्रश्नांचा पाऊस पडत असताना उत्तरांचा दुष्काळ संपणार का, हाच सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे.








