विठ्ठल – रुक्माईच्या दर्शनामागे नेमके कोणते राजकीय साकडे?
Aheri : विधानसभा निवडणुकीत वडील तथा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात बंड पुकारत राजकीय मैदानात उतरलेल्या भाग्यश्री आत्राम हलगेकर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. अलीकडच्या त्यांच्या राजकीय हालचालींमुळे अहेरीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान भाग्यश्री आत्राम यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळवत वडिलांविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. या पिता-कन्येतील संघर्षाने संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, निवडणुकीतील राजकीय समीकरणे त्यांच्या बाजूने जुळून आली नाहीत. त्यानंतर काही काळ त्या राजकीय घडामोडींपासून दूर असल्याचे चित्र होते.
आता मात्र त्यांच्या हालचालींनी पुन्हा राजकीय चर्चांना दिशा दिली आहे. अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर अहेरी येथील विठ्ठल-रुक्माई मंदिरात घेतलेले दर्शन यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मंदिरातील दर्शन हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग असू शकतो; मात्र सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर या भेटींकडे केवळ धार्मिक किंवा औपचारिक घडामोडी म्हणून पाहिले जात नाही.
विशेष म्हणजे, अहेरीच्या राजघराण्यातील राजकीय मतभेद आणि पिता-कन्येतील संघर्ष अद्याप चर्चेतून पूर्णपणे बाजूला गेलेला नाही. निवडणुकीच्या काळात झालेल्या बंडामागे खरोखरच स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची भूमिका होती की ती तत्कालीन राजकीय परिस्थितीतील रणनीती होती, याबाबतही त्यावेळी प्रश्न उपस्थित झाले होते.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांनीही राजकीय वातावरण तापवले आहे. अशा परिस्थितीत भाग्यश्री आत्राम हलगेकर यांची पुढील भूमिका काय असेल, त्या स्वतंत्र राजकीय वाटचाल कायम ठेवणार की नव्या समीकरणांमध्ये सहभागी होणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.
२३ वर्षांपूर्वी नाकारलेला प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर; मेळघाटच्या वनसंपदेवर घाला घालण्याची तयारी!
विठ्ठल-रुक्माईच्या चरणी त्यांनी नेमके कोणते साकडे घातले, हे त्यांनाच ठाऊक; मात्र त्यांच्या अलीकडील हालचालींमुळे अहेरीच्या राजकारणात नव्या घडामोडींची चाहूल लागली आहे. वडिलांविरोधात फुंकलेली बंडाची तुतारी पुढेही घुमणार की राजकारणात नवी दिशा घेणार, याचे उत्तर आगामी काळातच स्पष्ट होईल.








