संसद, रस्ता आणि न्यायालय अशा तिन्ही आघाड्यांवर लढण्याची घोषणा; आदिवासींचे जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी मैदानात
Amravati मेळघाटातील प्रस्तावित वीज प्रकल्पावरून जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एरवी शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे खासदार वानखडे यांनी यावेळी थेट आरपारच्या लढाईची भूमिका जाहीर केली आहे.
‘संसद, रस्ता आणि न्यायालय अशा तिन्ही आघाड्यांवर लढा देऊन हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मेळघाटातील आदिवासींचे जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण करण्यासाठी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळघाटातील आदिवासींना आजही अनेक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना मोठ्या प्रकल्पांना मात्र वेगाने परवानग्या दिल्या जात असल्याचा मुद्दा खासदारांनी उपस्थित केला आहे. ‘ज्यांचे जल आणि जंगल आहे, त्यांनाच मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवायचे आणि दुसरीकडे प्रकल्पांसाठी झटपट परवानग्या द्यायच्या, हे सरकारचे धोरण मान्य होणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
दुष्काळानंतर जाग आली; कायमस्वरूपी उपायांसाठी ‘पूल तिथे बंधारा’!
प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी होणारी संभाव्य जंगलतोड आणि आदिवासींच्या विस्थापनाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. मेळघाटातील नैसर्गिक संपत्तीचे नुकसान आणि स्थानिक नागरिकांचे विस्थापन कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
खासदार वानखडे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रस्तावित वीज प्रकल्पाचा मुद्दा आता राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, संसदेत हा मुद्दा कसा मांडला जाईल आणि सत्ताधारी पक्षाकडून त्यावर काय भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदारांनी थेट तिन्ही आघाड्यांवर लढण्याची घोषणा केल्याने मेळघाटातील वीज प्रकल्पाचा वाद आता अधिक चर्चेत राहणार, हे निश्चित.








