Maharashtra government can also get Rs 7,500 crore for Nashik Kumbh Mela : केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणूक प्रकल्प राबवा; छगन भुजबळ यांची सूचना
Nasik : ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना लागू आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून नाशिक कुंभमेळा २०२६-२७ साठी भांडवली गुंतवणूक प्रकल्प प्रस्तावित करण्यात यावे, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य या योजनेअंतर्गत राज्य शासनास भांडवली गुंतवणूक प्रकल्पांसाठी ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरुपात आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते.
भांडवली खर्चाचे अनेक पटीत होणारे परिणाम लक्षात घेऊन आणि राज्यांद्वारे केल्या जाणाऱ्या भांडवली खर्चाला चालना देण्यासाठी, केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२४-२५’ ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारांना २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या रूपात एकूण रु.१.५ लाख कोटी रूपयांची विशेष मदत देण्यात येत आहे.
Nana Patole : आश्वासन तर दिले, पण सोयाबीनला ६ हजारांचा भाव केव्हा देणार ?
सदर योजनेत आरोग्य, शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, पूल आणि रेल्वे यांसह विविध क्षेत्रांतील भांडवली गुंतवणूक प्रकल्पांना मंजूरी देण्यात येणार आहे. या क्षेत्रांतील प्रकल्पांची गती वाढावी, या उद्देशाने या दोन्ही योजनेतील राज्यांचा वाटा पूर्ण करण्यासाठीही निधी राज्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पास केंद्र शासनाचे १००% अर्थ सहाय्य उपलब्ध आहे. त्यामुळे राज्य शासनावर आर्थिक भार येणार नाही.
सदर योजनेतील भाग- ३ अन्वये जागतिक स्तरावरील आयकॉनिक टुरिस्ट सेंटरचा विकासाकरिता रु.५००० कोटी नियोजित केले होते आणि त्याअंतर्गत नाशिक महानगरपालिकेला गोदाघाट परिसरात ‘राम काल पथ’ उभारण्यास रु. ९९.१४ कोटी मंजूर झाले आहेत. या संदर्भात केंद्र शासनाच्या वित्त विभागाने ६ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्रान्वये सदर योजनेची मार्गदर्शक तत्वे निर्गमित करून आर्थिक वर्ष २०२४-२५ चे प्रस्ताव दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी मागवले होते. या योजने अंतर्गत प्रदान करण्यात येणारा निधी राज्यांच्या दीर्घकालीन फायद्यासाठी नवीन व चालू असलेल्या भांडवली प्रकल्पांसाठी वापरायचा आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ अंतर्गत अंदाजित ११.११ लाख कोटी भांडवली खर्चापैकी डिसेंबरपर्यंत केवळ ५.१३ लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत, जे मागील वर्षाच्या याच कालावधीत खर्चापेक्षा १३.५% कमी आहेत. त्यामुळे जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत उर्वरित ५.९८ लाख कोटी भांडवली खर्च वाढवण्यासाठी ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२४-२५’ मधील अटी केंद्र सरकार शिथिल करु शकते ज्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राने नाशिक कुंभमेळा २०२६-२७ साठी भांडवली गुंतवणूक प्रकल्प प्रस्तावित करून घेण्याची नितांत गरज आहे.
महाराष्ट्र शासनासदेखील सदर योजनेअंतर्गत कुंभमेळा २०२६-२७ साठी ७,५०० कोटी रूपयांच्या आराखड्यामधील भांडवली गुंतवणूक प्रकल्पांसाठी निधी मिळवता येईल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२४-२५’ अंतर्गत केंद्र शासनाकडून नाशिक कुंभमेळा २०२६-२७ साठी भांडवली गुंतवणूक प्रकल्प केंद्रीय अर्थ मंत्रालय भारत सरकार यांना प्रस्तावित करण्यात यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.