Construction of theater in Akola in final stage : अकोल्यातील नाट्यगृहाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता
माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील आणि आमदार रणधीर सावरकर या भाजपच्या दोन नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. पण अकोल्यातील रखडलेल्या नाट्यगृहाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. अकोल्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या नाटगृहाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी (3 डिसेंबर) खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावकर यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. लवकरच हे नाट्यगृह अकोलेकरांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास दर्शविला.
Akola अकोला शहराच्या पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुसज्ज सांस्कृतिक भवन व क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे . 2015 मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र राजकीय श्रेय वादामुळे या संस्कृती भवनासाठी आवश्यक निधी मिळवण्यात नेत्यांना अपयश आले. माजी खासदार संजय धोत्रे व दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांस्कृतिक भवन व्हावे म्हणून सर्वस्व पणाला लावले होते. नाट्यकर्मी राम जाधव यांनी हे नाट्यगृह व्हावे म्हणून आटोकाट प्रयत्न केले.
आमदार सावरकर यांनी हे नाट्यगृह व परिसरातील क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांची विनंती मान्य केली. अकोल्यातील या सांस्कृतिक भवनासाठी 15 कोटी रुपये मंजूर केले. प्रस्तावित कामामध्ये बदल करून कामाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे अडीच वर्षे या सांस्कृतिक भवनाचे काम ठप्प पडले होते.
Bhandara Guardian Minister : डॉ. परिणय फुके ठरवणार भंडाऱ्याचा पालकमंत्री ?
सुधीर मुनगंटीवार यांनी निधी मंजूर केला
सत्तापालट झाल्यानंतर तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आमदार सावरकर यांनी पाठपुरावा केला. सुधीर मुनगंटीवार यांनी निधी मंजूर केल्यानंतर उर्वरित काम सुरू झाले. आता काम अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्यादरम्यान याचे उद्घाटन व्हावे या दृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे. आमदार सावरकर यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. काही दुरुस्त्यादेखील सुचवल्या. त्यांच्यासोबत विजय अग्रवाल, जयंत मसने, गीतांजली शेगोकार, राहुल देशमुख आदी उपस्थित होते.
राजकीय वादात रखडले अकोल्यातील अनेक प्रकल्प
भाजपमधील अंतर्गत वाद व भाजप विरुद्ध इतर पक्षांतील वादामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यातच सांस्कृतिक भवनाचा समावेश होता. अकोला-अकोट मार्ग, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांसारखे महत्त्वाकांशी प्रकल्पही गेल्या नऊ वर्षांपासून अपूर्ण आहेत.








