An eight-and-a-half-year-old child has GBS disease : अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
Khamgao जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील सोहम दिलीप भोपळे (वय ८) याला जीबीएस (गिलियन बारी सिंड्रोम) हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले आहे. सध्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या बातमीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
राज्यात सध्या जीबीएसने थैमान घातले आहे. राज्यातील प्रत्येकच जिल्ह्यात जीबीएसचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. शिवाय घाबरून न जाण्याचे आवाहन डॉक्टर व सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष ज्या कुटुंबातील चिमुकल्याला या आजाराने ग्रासले आहे, त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण भागात जीबीएसचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या आजारामुळे शरीराच्या मज्जातंतूंवर परिणाम होतो आणि हाता-पायातील शक्ती कमी होते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दूषित पाणी व अन्नामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. सोहमला पंधरा दिवसांपूर्वी अशक्तपणा जाणवू लागला. स्थानिक स्तरावर तसेच जळगाव जामोद आणि खामगाव येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला अकोल्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
तेथे १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या तपासणीत जीबीएसची पुष्टी झाली. खासगी रुग्णालयातील उपचार खर्च मोठा असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. शासकीय योजनेंतर्गत बालकावर मोफत उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत २० ते २५ टक्के सुधारणा झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. विशेष म्हणजे, खेर्डा गावात याआधीही एका लहान मुलामध्ये अशीच लक्षणे दिसून आली होती. मात्र उपचारानंतर तो बालक बरा झाला.
Devendra Fadanvis : ‘फिक्सर’ लोकांना अजिबात मान्यता देणार नाही !
जीबीएस म्हणजे काय?
हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच मज्जातंतूंवर हल्ला करते. त्यामुळे चालणे, बसणे कठीण होते. शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार सुरू असल्याने सोहमच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.








