Villagers stage protest against load shedding : संतप्त ग्रामस्थांचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
Gondia चिचगड जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांनी महावितरणच्या वीज अडचणींचा जाहीरपणे निषेध नोंदवत देवरी येथील महावितरण उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. सततच्या भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी दोन तास ठिय्या आंदोलन करत संतप्त घोषणाबाजी केली. “आम्हाला अखंड वीज हवी, वीज नाही तर आम्हीही शांत बसणार नाही!” अशा घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाचं नेतृत्व उपसभापती शालिकराम गुरुनुले, मगरडोहचे उपसरपंच देवविलास भोगारे, दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार, यशवंत गुरुनुले, गणेश तोफे, महेंद्र निकोडे आदींनी केलं. त्यांनी कार्यकारी अभियंता फुलझेले यांना विविध मागण्यांचं लेखी निवेदन सादर केलं.
Bhandara District Administration : मुली भारावल्या! म्हणाल्या, ‘स्वप्नातही विमानप्रवास केला नव्हता’
चिचगड उपकेंद्रांतर्गत सर्व गावांना ४४० केव्ही क्षमतेने अखंड वीजपुरवठा करावा. चिचगड उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा. भारनियमन पूर्णपणे थांबवावं आणि २०२५पूर्वी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कृषी मीटर द्यावेत. उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता बदलावा. सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून सेवा द्यावी, अश्या मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जावा अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी केली. कार्यकारी अभियंता फुलझेले यांनी आंदोलकांशी संवाद साधून पुढील दोन दिवसांत वीज समस्या सोडवण्याचं लेखी आश्वासन दिलं. मात्र, दिलेल्या वेळेत जर कोणताही ठोस निर्णय झाला नाही, तर यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
या आंदोलनात कलिंद्र गुरुनुले, आसाराम पालीवाल, देवेंद्र गावळ, एकनाथ सोनुले, हंसराज ठाकरे यांच्यासह ग्राम पालांदूर, मगरडोह, टेकरी, रामगड, सुकळी, ढोडरा, रोपा, सिंगनडोह, घोनाडी, बोन्डे, पळसगाव आदी गावांतील शेकडो नागरिकांनी सक्रीय सहभाग घेतला. विशेषतः शेतकरी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली नाराजी व्यक्त केली.
CM Devendra Fadnavis : प्रत्येक विद्यापीठात दिव्यांग संशोधन केंद्र!
‘वीज नाही तर आंदोलन कायम’
आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी जनतेचा रोष आता उफाळून आला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, आम्ही न्यायासाठी लढणारच”, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली. महावितरणने जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर संपूर्ण तालुक्यात वीज विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्ज इशारा देण्यात आला आहे.








