Amravati Uddhav Thackeray Shivsena district president resigns, likely to join Eknath shinde Shivsena : उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी घडामोड, बच्चू कडूंची भूमिका काय?
Amravati राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच अमरावतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे अमरावती जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी ही घडामोड घडल्याने तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.
नरेंद्र पडोळे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील नाराजीमुळे पडोळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अचलपूर आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक जबाबदारी त्यांच्याकडे होती. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही घडामोड ठाकरे गटासाठी धक्कादायक मानली जात आहे.
गेल्या काही महिन्यांत ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गट अथवा भाजपमध्ये प्रवेश केल्याचे चित्र दिसत आहे. त्यात आता अमरावतीतील या महत्त्वाच्या राजीनाम्याची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, शिंदे गट मात्र सातत्याने संघटन विस्तारावर भर देत असून नव्या चेहऱ्यांना पक्षात सामावून घेत आहे.
दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जवळीक वाढवल्यानंतर अमरावती विभागातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याची चर्चा सुरू आहे. बच्चू कडू यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर शिंदे सेनेत प्रवेश केला होता. आता नरेंद्र पडोळे हेही बच्चू कडू यांच्या माध्यमातून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
राजीनाम्यापूर्वी पडोळे आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा झाल्याचेही बोलले जात असून या निर्णयामागील नेमके राजकीय गणित काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, पडोळे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.








