Arun lakhani wins unopposed from wardha-chandrapur-gadchiroli mlc election : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची ऐनवेळी माघार
Nagpur नागपूर आणि यवतमाळ पाठोपाठ विदर्भातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसला भीषण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर कोठारी यांनी शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने भाजप-महायुतीचे उमेदवार अरुण लखानी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
वर्धा मतदारसंघात सुरुवातीला भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर होईल अशी चिन्हे होती, कारण संख्याबळाचा विचार करता भाजपकडे ३४१ तर काँग्रेसकडे २९३ मते होती. याव्यतिरिक्त दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि तब्बल ६४ अपक्ष नगरसेवकांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर राजकीय घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. निवडणूक जाहीर होताच काँग्रेससह अनेक अपक्ष नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाले होते, तर चंद्रपूर आणि गडचिरोलीचे नगरसेवक थेट गोव्याला पर्यटनाला गेले होते. हे सर्व बघून काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी आधीच मनातून माघार घेतली होती. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुरुवातीला आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र पक्षांतर्गत हेवेदावे आणि भांडणे पाहून त्यांनी मुलीचा विषय सोडून दिला. शेवटी काँग्रेसने शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली, मात्र अरुण लखानी आणि भाजपची भक्कम तटबंदी भेदणे अशक्य असल्याचे स्पष्ट होताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेत मैदान सोडले.
Mlc election : ठाण्यापासून चंद्रपूरपर्यंत आठ ठिकाणी बिनविरोध विजय!
हा विजय पूर्णपणे भाजपच्या अचूक नियोजनाचा आणि मायक्रो-प्लॅनिंगचा मानला जात आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळीच पराभव निश्चित असल्याने विरोधकांनी उमेदवारी मागे घ्यावी असे आवाहन केले होते, तसेच अपक्षांशी आमची बोलणी सुरू असल्याचे सांगून त्यांनी काही संकेतही दिले होते, जे दुपारपर्यंत तंतोतंत खरे ठरले. यवतमाळ आणि वर्ध्यात विरोधकांनी शस्त्रे टाकली असली तरी नागपूरमध्ये मात्र निवडणूक अटळ झाली आहे. विजयाची कोणतीही खात्री नसतानाही काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी मैदानात कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या तुलनेत काँग्रेस आघाडीकडे नागपूरमध्ये संख्याबळ अत्यंत कमी आहे, असे असले तरी राजकीय अनपेक्षित उलटफेर टाळण्यासाठी भाजप महायुतीला आपल्या मतदारांना शेवटपर्यंत सांभाळून ठेवावे लागणार आहे. विरोधकांच्या या शरणागतीमुळे एकीकडे विदर्भातील काँग्रेसच्या गोटात प्रचंड शांतता पसरली आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने आपला राजकीय वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.








