Triangular fight between pravin pote, harshjit deshmukh and Nilesh Vishwakarma for Amravati mlc: अपक्ष आणि छोट्या पक्षांवर सर्वांचे लक्ष, बाजोरिया यांना हायकोर्टाचा धक्का
Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेणाऱ्या विप्लव बाजोरिया यांनाही कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आता महायुतीचे प्रवीण पोटे पाटील, महाविकास आघाडीचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मा यांच्यात त्रिकोणी सामना रंगणार आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे.
शिवसेनेच्या (शिंदे गट) विप्लव बाजोरिया यांचा नामांकन अर्ज छाननीदरम्यान बाद ठरविण्यात आला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून निवडणूक लढविण्याची परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवण्यात आल्याने या निवडणुकीत त्यांचा मार्ग बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
निवडणुकीची प्रमुख वैशिष्ट्ये
– मतदान : १८ जून २०२६
– एकूण मतदार : ४५३
– प्रशांत महल्ले यांनी उमेदवारी मागे घेतली
– प्रवीण पोटे पाटील, हर्षजित देशमुख आणि नीलेश विश्वकर्मा यांच्यात थेट लढत
असे आहे पक्षीय बलाबल
४५३ मतदार असलेल्या या निवडणुकीत महायुतीचे पारडे तुलनेने जड मानले जात आहे. मात्र, फोडाफोडीचे राजकारण, क्रॉस व्होटिंगची शक्यता आणि काही पक्षांतील अंतर्गत नाराजी यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.
Mlc election : ठाण्यापासून चंद्रपूरपर्यंत आठ ठिकाणी बिनविरोध विजय!
पक्ष| मतदार संख्या
भाजप| १५०
काँग्रेस| १२०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)| ३३
युवा स्वाभिमान पार्टी| २६
अपक्ष| २५
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना| २१
प्रहार जनशक्ती पक्ष| २१
शिवसेना (शिंदे गट)| १८
एमआयएम| १६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)| ११
वंचित बहुजन आघाडी| ७
बहुजन समाज पार्टी| ३
समाजवादी पक्ष| २
आकडेवारीनुसार भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि युवा स्वाभिमान पार्टी यांच्या एकत्रित ताकदीमुळे महायुतीची स्थिती मजबूत दिसत आहे. दुसरीकडे, काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीला अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांवर मोठी भिस्त आहे.
विशेषतः प्रहार जनशक्ती पक्षाचे २१ आणि एमआयएमचे १६ मतदार कोणत्या उमेदवाराला पसंती देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे हर्षजित देशमुख हे महायुतीचे प्रवीण पोटे पाटील यांना कितपत प्रभावी आव्हान देतात आणि अपक्षांची भूमिका काय राहते, यावर या निवडणुकीचा अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे.








