Sudden departure from Baramati hostel creates stir in political circles : बारामती हॉस्टेलमधून अचानक निघून गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune: राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असलेले अजित पवार कोणालाही पूर्वकल्पना न देता, कोणताही सरकारी ताफा, पायलट कार किंवा पोलीस संरक्षण न घेता एकटेच बाहेर पडल्याने ते काही काळ ‘नॉट रिचेबल’ झाले. त्यामुळे अजित पवार नेमके कुठे गेले आणि यामागे कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये मुक्कामाला असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, बैठका आणि राजकीय गाठीभेटी घेत होते. आज सकाळी मात्र अचानकपणे त्यांनी बारामती हॉस्टेल सोडले. विशेष म्हणजे, नेहमी त्यांच्या सोबत असणारा पोलीस बंदोबस्त, पायलट कार आणि सुरक्षारक्षकांचा ताफा हॉस्टेल परिसरातच थांबलेला असताना अजित पवार एकटेच वाहनातून निघून गेले. त्यांच्या या अचानक हालचालीमुळे उपस्थित अधिकारी, कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
Local Body Elections : पुरे झाली राजकीय चिखलफेक, आता काम करा!
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती. महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचे प्राथमिक सूत्रही ठरल्याची चर्चा होती. मात्र, निवडणूक चिन्हावरून म्हणजेच घड्याळ की तुतारी या मुद्द्यावरून ऐनवेळी चर्चा फिसकटल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवार गटासोबतची चर्चा अपयशी ठरल्यानंतर अजित पवारांनी अचानक बारामती हॉस्टेल सोडल्याने त्यांच्या या हालचालींना राजकीय संदर्भ जोडला जात आहे. काही काळ अजित पवारांचा संपर्क होत नसल्याने ते कौटुंबिक कारणासाठी बाहेर पडले की एखाद्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचा भाग आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
Local Body Elections : ‘एमआयएम’चे वाढतेय प्रस्थ, काँग्रेसची वाढतेय चिंता
यानंतर काही वेळातच अजित पवारांचे वाहन त्यांच्या ‘जिजाई’ या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर आली. प्रारंभी ते नेमके जिजाईमध्येच आहेत की अन्यत्र गेले आहेत, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, नंतर स्पष्ट झाले की बारामती हॉस्टेलमधून चीडचीड करत एकटेच बाहेर पडलेले अजित पवार थेट जिजाई निवासस्थानी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी मागून आपला अधिकृत ताफाही बोलावून घेतला.
Local Body Elections : सिंदखेडराजा नगर परिषदेत ‘मेहेत्रे पॅटर्न’चा दबदबा!
दरम्यान, जिजाई निवासस्थानी शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते. ही बैठक नेमकी कशासाठी होती, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण, निवडणूक रणनीती आणि पुढील वाटचाल यावर चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमोल कोल्हे बैठकीनंतर जिजाई निवासस्थानातून बाहेर पडले असून अजित पवारांच्या अचानक हालचालींमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
__








