Unrest in Congress Party over new appointments : सपकाळ यांच्याकडे पदाधिकाऱ्यांची धाव, संघटनात्मक घडामोडींचीही दिली माहिती
Akola जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्यापही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते हेमंत देशमुख यांनी नुकतीच सपकाळ यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडी आणि नव्या नियुक्त्यांबाबतची नाराजी प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही दिवसांपूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश तायडे यांची, तर महानगर काँग्रेस अध्यक्षपदी महेंद्र गवई यांची नियुक्ती करण्यात आली. ‘सृजन संघटन महाराष्ट्र’ अभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचा काँग्रेसकडून दावा करण्यात आला असला, तरी ही निवड सर्वानुमते झालेली नसल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
Sanjay Gaikwad: माझ्या मतदारसंघातही हस्तक्षेप होतोय; संजय गायकवाडांचा अब्दुल सत्तारांच्या सुरात सूर
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सुमारे ६० ते ६५ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत नव्या नियुक्त्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याने जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे. या भेटीचे छायाचित्रही सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले असून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Khamgao – jalna railway : रेल्वे अजून रुळावर नाही, पण श्रेयाची गाडी सुपरफास्ट!
दरम्यान, अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत या घडामोडींमधून मिळत आहेत. आगामी काळात जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करताना सर्व गटांना योग्य प्रतिनिधित्व देणे आणि संघटनात्मक समतोल राखणे, हे प्रदेश नेतृत्वासमोरील मोठे आव्हान ठरणार असल्याचे मत पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.








