व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Gaikwad: माझ्या मतदारसंघातही हस्तक्षेप होतोय; संजय गायकवाडांचा अब्दुल सत्तारांच्या सुरात सूर

Sanjay Gaikwad: माझ्या मतदारसंघातही हस्तक्षेप होतोय; संजय गायकवाडांचा अब्दुल सत्तारांच्या सुरात सूर

Sanjay Gaikwad claims of having interference of other leaders in constituency: महायुतीत खच्चीकरणाचे राजकारण?; गायकवाडांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

Buldhana शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा महायुतीतील अंतर्गत अस्वस्थतेवर भाष्य करत मित्रपक्षांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा खरी असल्याचे सांगत, “एकमेकांचे खच्चीकरण करणे हे कोणत्याही युतीसाठी हिताचे नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. विशेष म्हणजे, आपल्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप होत असल्याचा दावा करत त्यांनी महायुतीतील समन्वयाच्या प्रश्नावर बोट ठेवले.

अलीकडेच आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपकडून शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांची झालेली गळाभेटही राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Malkapur municipal council: घरात पाणी, प्रशासन झोपी! वाकोडी ग्रामस्थांचा रास्तारोको

प्रसारमाध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली जात असल्याच्या भावनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५० आमदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र, त्यानंतरही मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची भावना शिवसेनेतील अनेक नेत्यांमध्ये असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून सूचित झाले.

सातारा येथील घटनेचा संदर्भ देत त्यांनी राज्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांवरील हल्ल्यांनंतरही ठोस कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबतही उदाहरण देत, मित्रपक्षांमध्ये समान वागणूक मिळते का, असा प्रश्न उपस्थित केला.

School bus fare : शालेय बस प्रवास महागला; जूनपासून १५ टक्के भाडेवाढ लागू

“माझ्या मतदारसंघातदेखील मित्रपक्षाचा हस्तक्षेप होत आहे. युतीमध्ये राहून एकमेकांचे राजकीय खच्चीकरण करणे महायुतीच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते,” असे गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले.

गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नाराजीचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!