Tension at Ex-Mayor’s residence as woman aspirant faints : माजी महापौरांच्या निवासस्थानी घडला प्रकार, भावनांचा उद्रेक
Akola अकोला महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षा, नाराजी आणि भावनिक उद्रेकाचे चित्र ठळकपणे दिसून येत आहे. अकोल्यातील भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी एक घटना घडली. उमेदवारी न मिळाल्याच्या तणावातून एका इच्छुक महिला उमेदवाराच्या समर्थकांनी तेथे गोंधळ घातल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. याच गोंधळात संबंधित महिला उमेदवार भावनिकदृष्ट्या कोलमडली आणि अचानक बेशुद्ध पडली.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी यादी जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी माजी महापौरांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. आपल्या प्रभागातून उमेदवारी मिळावी, यासाठी काहींनी थेट भेटीगाठी केल्या, तर काहींनी भावनिक साद घालण्याचा मार्ग अवलंबल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Akola Municipal Corporation Election : पक्षनिष्ठा गुंडाळून कोलांटउड्या, पक्षांतरांचा सपाटा
याचदरम्यान एका इच्छुक महिला उमेदवाराने आपली कैफियत मांडताना भावनांवरचा ताबा गमावला. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि तणाव वाढत असतानाच तिला चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली. ही घटना घडताच उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नातेवाइकांनी तत्काळ धाव घेत महिलेला सावरले. पाणी शिंपडून व प्राथमिक उपचार देत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने काही वेळात तिची प्रकृती स्थिर झाली असून पुढील उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला.
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असला, तरी उमेदवारीसाठी चाललेली धडपड, वाढता तणाव आणि भावनिक उद्रेक पक्ष नेतृत्वासमोर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. या घटनेवरून अकोल्यातील राजकीय वातावरण अधिक तापत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.
Amravati Municipal Corporation election : महायुती दुभंगली; नाराजीचा सूर, राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार
या घटनेमुळे उमेदवारी प्रक्रियेतील तणाव किती टोकाला पोहोचला आहे, याचे विदारक दर्शन घडले. पक्षातील अंतर्गत राजकारण, मर्यादित जागा आणि इच्छुकांची वाढती संख्या यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन ढासळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.








