व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शिक्षक मतदारसंघाच्या यादीतच ‘बोगस शिक्षक’!

शिक्षक मतदारसंघाच्या यादीतच ‘बोगस शिक्षक’!

काँग्रेसचा गंभीर आरोप, मतदारयादीच्या चौकशीसाठी विरोधक आक्रमक

Yavatmal : विधान परिषद अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत पात्रता नसलेल्या आणि प्रत्यक्ष शिक्षक म्हणून कार्यरत नसलेल्या व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या कथित प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मतदारयादीची तातडीने सखोल पडताळणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांनी केली आहे.

याबाबत नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीची तपासणी करण्याची मागणी केली. संबंधित शाळांमधील मंजूर शिक्षकांची संख्या आणि मतदारयादीत नोंद असलेल्या शिक्षकांची संख्या यांची स्वतंत्रपणे पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. केवळ कागदोपत्री नोंद पाहून विषय निकाली न काढता प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन उपलब्ध अभिलेखांची तपासणी करावी, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

मतदारयादीत नोंद असलेल्या शिक्षकांची नावे संबंधित शाळेचे हजेरी रजिस्टर, वेतन रजिस्टर, सेवा अभिलेख, संचमान्यता आणि इतर अधिकृत कागदपत्रांशी तपासून पाहावीत. मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेल्या कार्यरत शिक्षकांची संख्या आणि शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या शिक्षक पदांची संख्या यामध्ये काही तफावत आहे का, याचीही चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गडचिरोली काँग्रेसमधील गटबाजीपासून मनोहर पोरेटींचे अंतर

अनुदानित शाळांच्या बाबतीत संचमान्यतेनुसार मंजूर पदे, प्रत्यक्ष कार्यरत शिक्षक आणि मतदारयादीतील शिक्षकांची संख्या यांचा स्वतंत्र ताळमेळ घालण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. त्यामुळे मतदारयादीत अपात्र व्यक्तींची नोंद झाल्याचे आरोप कितपत खरे आहेत, हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, शिक्षक म्हणून प्रत्यक्ष कार्यरत नसतानाही शिक्षक मतदारसंघासाठी मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या व्यक्तींची तसेच अशा नोंदणीसाठी प्रमाणपत्र किंवा सत्यापन देणाऱ्या मुख्याध्यापकांची भूमिकाही तपासावी, अशी मागणी सचिन नाईक यांनी केली. खोटे प्रमाणपत्र किंवा चुकीचे सत्यापन दिल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्णी तालुका गटात महायुतीला मोठा धक्का, राजकीय गणित बदलले

निवडणूक प्रक्रियेत जाणीवपूर्वक अपात्र व्यक्तींची नोंदणी करून मतदारयादीवर प्रभाव टाकण्याचा प्रकार आढळल्यास हा केवळ प्रशासकीय गैरप्रकार न मानता निवडणूक प्रक्रियेवरील गंभीर आघात म्हणून त्याकडे पाहावे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे प्रशासन या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि मतदारयादीची प्रत्यक्ष चौकशी कधी सुरू होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!