व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण गडचिरोली काँग्रेसमधील गटबाजीपासून मनोहर पोरेटींचे अंतर

गडचिरोली काँग्रेसमधील गटबाजीपासून मनोहर पोरेटींचे अंतर

‘भाऊ’ कुणाचाही असो, पक्षासोबतच राजकीय वाटचालीचा सेफ गेम!

Gadchiroli : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. पक्षातील काही नेते एका ‘भाऊं’च्या जवळ असल्याचे दिसत असताना काहींनी दुसऱ्या गटाची सावली पकडल्याची चर्चा आहे. मात्र, या गटबाजीपासून काहीसे अंतर राखत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी आपली स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसमधील ‘गटबाजीच्या राजकारणा’त पोरेटींचा सावध आणि मोजून-मापून चाललेला ‘सेफ गेम’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पोरेटी यांनी राजकीय घडामोडींमध्ये खचून न जाता पुन्हा पक्षसंघटन आणि कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत असताना कोणत्याही एका गटाशी थेट बांधिलकी न ठेवता पक्षाच्या व्यासपीठावर सक्रिय राहण्याची त्यांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नसले तरी पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारात पोरेटी सक्रिय दिसत आहेत. पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याबरोबरच संघटनात्मक पातळीवर आपली पकड कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

आर्णी तालुका गटात महायुतीला मोठा धक्का, राजकीय गणित बदलले

विशेष म्हणजे, धानोरा तालुका हा पोरेटींचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या भागातील राजकीय संपर्क वाढविल्याची चर्चा आहे. गावागावांतील कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी आणि समर्थकांशी संपर्क साधत आगामी राजकीय समीकरणांचा अंदाज घेण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसते.

काँग्रेसमधील गटबाजी तीव्र होत असताना कोणत्याही एका गटाच्या छावणीत जाण्याऐवजी पक्षाच्या मूळ प्रवाहात राहण्याचा पोरेटींचा प्रयत्न राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. आज एका ‘भाऊं’चे पारडे जड, तर उद्या दुसऱ्या ‘भाऊं’ची ताकद वाढली, तरी आपली राजकीय दिशा बदलू नये, अशीच त्यांची रणनीती असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे.

‘शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल’ म्हणत वडेट्टीवारांचा आंदोलनाचा इशारा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गडचिरोली काँग्रेसमधील गटबाजीचे परिणाम कितपत दिसतात आणि मनोहर पोरेटी यांचा हा ‘सेफ गेम’ त्यांना कितपत राजकीय फायदा मिळवून देतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, सध्याच्या राजकीय चित्रावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते ‘भाऊ’ कुणाचाही असो, पोरेटींचा राजकीय खेळ मात्र पक्षासोबतच!

error: Content is protected !!