एका रात्रीत पालटले नागपूरचे राजकारण; वंजारींचा कॉन्फिडन्स कायम
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एक अत्यंत नाट्यमय आणि मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपचे बंडखोर नेते तथा माजी आमदार अनिल सोले यांनी पुकारलेले बंड अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट व मध्यस्थीमुळे अवघ्या काही तासांत शांत झाले आहे. यामुळे भाजपवरील एक मोठे संकट तूर्तास टळले असून, सोले यांनी आपली उमेदवारी मागे घेत भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
नागपूर पदवीधर निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे संतापलेल्या अनिल सोले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीची रणधुमाळी उडवून दिली होती. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि सोले यांच्या मागे वाढलेला जनप्रतिकार यामुळे भाजपच्या गोटात मोठी चिंता निर्माण झाली होती.
अनिल सोले यांची मनधरणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रयत्न केले, परंतु सोले नॉट रिचेबल राहत आपल्या भूमिकेवर अडून राहिले. राज्याचे महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांनी सोले यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या पदांचा राजीनामा देत आपले कार्यालय खुले केल्यामुळे तिरंगी लढत अटळ मानली जात होती.
काँग्रेस आऊटडेटेट झालेला पक्ष, कुठल्याही स्थराला जाऊ शकतो, मुख्यमंत्र्यांचा घणाघात
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, मुख्यमंत्र्यांनी आज नागपुरात पूर्व विदर्भातील आमदारांची तातडीची बैठक बोलावली. निवडणुकीचा आढावा जाणून घेतला. सोलेंमुळे जागा धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही मध्यस्थ न ठेवता रात्री थेट अनिल सोले यांचे घर गाठले. यानंतर चित्रच पालटले. मुख्यमंत्र्यांनी सोले यांना कुठले राजकीय गाजर दिले हे सध्या गुलदस्त्यात आहे. अडगळीत टाकलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी आपण लढा देत असल्याचे सोले यांनी जाहीर केले होते. आता त्यांचे काय होणार या प्रश्नांची उत्तरे सोले यांना द्यावी लागणार आहे.
मुख्यमंत्री माझ्याकडे आले. त्यांनी मला उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. आमची आपसात सकारात्मक चर्चा झाली, त्यामुळे मी उमेदवारी मागे घेत आहे.
-अनिल सोले








