व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Assembly adjourned : अतिवृष्टीचा विधिमंडळावरही परिणाम; विधानसभा स्थगित

Assembly adjourned : अतिवृष्टीचा विधिमंडळावरही परिणाम; विधानसभा स्थगित

maharashtra-heavy-rain-assembly-adjourned-cm-devendra-fadnavis-work-from-home-appeal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ‘वर्क फ्रॉम होम’चे आवाहन

Mumbai: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. अतिवृष्टीची गंभीरता लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी विधानसभेचे उर्वरित कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली. तसेच राज्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी खासगी आणि शासकीय कार्यालयांना शक्य असेल तेथे ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करण्याचेही आवाहन केले.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षातील सदस्य विजय वडेट्टीवार, अजय चौधरी आणि अमित पटेल यांनी मुंबईतील वाढत्या दुर्घटनांचा मुद्दा उपस्थित केला. मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळत असून, वेळेत छाटणी न झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. झाडे कोसळून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने मुंबई महानगरपालिकेला तातडीने झाडांची छाटणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर मोठ्या खर्चातून उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांवर तडे गेल्याचा मुद्दाही विरोधकांनी उपस्थित करत दोषींवर कारवाई आणि खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

Prafulla gudaghe : ओबीसीच्या नावावर पदे भोगणाऱ्या भाजप नेत्यांना प्रफुल गुडधेंचे ‘पत्रअस्त्र’; चंद्रशेखर बावनकुळेंना पहिले पत्र, ८२ नेत्यांना कोंडीत पकडणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना राज्यासमोर अभूतपूर्व नैसर्गिक संकट उभे असल्याचे सांगितले. विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे असले तरी सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारी मुंबईत सुमारे ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते, तर दुपारनंतर ७० ते ९० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी पावसाळ्यात सरासरी ८०० झाडे कोसळतात, मात्र यंदा एका दिवसातच सुमारे ३५० झाडे पडल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, कार्यालयांनी शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधा द्यावी. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील दरड कोसळल्यानंतर तातडीने वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री यांनी दिली. अडकलेल्या वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू असून, महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलीस, महसूल विभाग आणि इतर यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

Flood updates : मुसळधार पावसाने महाराष्ट्र ठप्प! मुंबई विस्कळीत

दरम्यान, नुकत्याच घडलेल्या इमारत दुर्घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, संबंधित इमारत बेकायदेशीर होती. ती कोसळल्यानंतर शेजारील झोपड्यांवर ढिगारा पडल्यामुळे तेथील नागरिकांचा मृत्यू झाला. अशा दुर्घटनांबाबत तसेच पावसाळ्यापूर्वीच्या तयारीसंदर्भातील सविस्तर निवेदन मंगळवारी सभागृहात सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आपत्कालीन परिस्थिती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी दिवसाचे उर्वरित कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली. विधानसभेची पुढील बैठक मंगळवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना धोकादायक इमारती, झाडे, पूरग्रस्त भाग आणि डोंगराळ परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले. विशेषतः पावसाळी पर्यटन, धबधबे आणि घाटमाथ्यावरील सहली टाळाव्यात, असे सांगत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

__

error: Content is protected !!