cm-devendra-fadnavis-replies-to-opposition-over-mumbai-pune-missing-link-landslide-row : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर राजकीय आरोप – प्रत्यारोप
Mumbai : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्यानंतर या घटनेवरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोणतीही तांत्रिक माहिती न घेता विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला असून, ही विरोधकांच्या मेंदूतून ‘मिसिंग’ झालेल्या अक्कलचीच निशाणी असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमधून केली आहे.
मुंबईतील मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि विविध दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरडीच्या घटनेने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. विरोधकांनी या घटनेत भ्रष्टाचाराचा आरोप करत सरकारवर निशाणा साधला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, दरड कोसळली ती बोगद्याच्या मुख्य संरचनेवर नव्हे, तर प्रवेशद्वाराबाहेरील डोंगराच्या उतारावर आहे. बोगदा तुटलेला नाही, त्यामध्ये पाणी शिरलेले नाही आणि प्रकल्पाच्या मुख्य संरचनेलाही कोणतेही नुकसान झालेले नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हा पूर्णपणे नैसर्गिक भूगर्भीय प्रकार असून, जगातील अत्याधुनिक बोगदा प्रकल्पांमध्येही अशा घटना घडत असतात. त्यामुळे या घटनेचा संबंध निकृष्ट दर्जाच्या बांधकामाशी किंवा भ्रष्टाचाराशी जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
Assembly adjourned : अतिवृष्टीचा विधिमंडळावरही परिणाम; विधानसभा स्थगित
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तथ्यांपेक्षा अफवांच्या आधारावर राजकारण केल्याचा आरोप केला. काही नेत्यांना प्रत्येक नैसर्गिक घटनेत भ्रष्टाचारच दिसतो, कारण त्यांना स्वतःचा भूतकाळ आठवतो, अशी टीकाही त्यांनी केली. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवणे हा काही विरोधी पक्षांच्या राजकारणाचा भाग बनल्याचा आरोप त्यांनी केला.
मिसिंग लिंक प्रकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांनी २०१३ मध्ये या प्रकल्पाला अडथळे का निर्माण केले, याचे उत्तर द्यावे, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता, तर महाराष्ट्राला त्याचा लाभ अनेक वर्षांपूर्वीच मिळाला असता, असे त्यांनी म्हटले. विकासाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत सातत्याने अडथळे निर्माण करणारेच आज प्रश्न उपस्थित करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुंबई – पुणे मिसिंग लिंक हा केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या आधुनिक अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आशियातील अत्यंत आव्हानात्मक पायाभूत प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची सुरक्षा व्यवस्था आणि कठोर गुणवत्ता निकषांच्या आधारे त्याची उभारणी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरड कोसळणे आणि बोगद्याच्या संरचनेतील दोष या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे समजून न घेता आरोप करणे म्हणजे तांत्रिक अज्ञानाचे प्रदर्शन असल्याची टीकाही त्यांनी केली.
“दरड म्हणजे भ्रष्टाचार असता, तर हिमालयातील प्रत्येक भूस्खलनालाही भ्रष्टाचार म्हणावे लागले असते,” असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नैसर्गिक आपत्ती आणि बांधकामातील गुणवत्तेची गल्लत करू नये, असे आवाहन केले. विकास प्रकल्पांबाबत खोटी माहिती पसरवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार व्हायला हवा, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
राज्यातील जनतेला आता तथ्य आणि अफवा यातील फरक समजतो, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला जबाबदार राजकारणाची गरज असल्याचे अधोरेखित केले. संकटाच्या काळात विकास प्रकल्पांवर अविश्वास निर्माण करण्याऐवजी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. काही नेते प्रसिद्धीसाठी वैयक्तिक टीका करत असले, तरी त्यामुळे विकासाची गती थांबणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “दरड डोंगरावर कोसळली आहे; मात्र काही विरोधकांचा विवेक, तांत्रिक समज आणि जबाबदारीची भावना अधिकच कोसळलेली दिसते. महाराष्ट्राला अफवांचे नाही, तर विकासाचे राजकारण हवे आहे,” अशा शब्दांत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
__








